•१०० व्या महास्वच्छता अभियानात पाच टन कचरा व प्लॅस्टिक गोळा
कोल्हापूर • प्रतिनिधी
महापालिकेच्यावतीने गेले १०० आठवडे सुरु असलेले प्रत्येक रविवारचे महास्वच्छता अभियान येथून पुढेही सर्वांच्या सहकार्याने सुरु ठेवणार असल्याचे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे सांगितले.
दसरा चौक येथील संप आणि पंप हाऊस येथे रविवारी सकाळी १००व्या स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. महाराष्ट्र राज्य पुणे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त चेतन कोंडे, संदीप घार्गे, आरोग्याधिकारी डॉ.अशोक पोळ, जल अभियंता नारायण भोसले, क्रिडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, विकी महाडिक, स्वच्छतादूत अमित देशपांडे, मुख्य आरोग्य निरिक्षक जयवंत पवार यांच्या उपस्थितीत करण्यात आला. सर्वांनी सोशल डिस्टंस ठेवून या स्वच्छता मोहिमेत सहभाग नोंदविला. यावेळी याठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपनही करण्यात आले.
प्रशासक डॉ. बलकवडे यांनी यावेळी महाराष्ट्र राज्य पुणे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांचा पुष्पगुच्छ व शाल देऊन सत्कार केला.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे म्हणाल्या, महाराष्ट्र राज्याचे पुणे भूजल सर्वेक्षण विभागाचे संचालक डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी सुरु केलेले हे अभियान आम्ही सुरु ठेवले असून येथून पुढेही असेच अखंडपणे सुरु राहील. हे अभियान राबविण्यासाठी विविध सामाजिक संस्था, संघटना व नागरीकांचे बहुमोल सहकार्य लाभले आहे.
डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी यांनी या अभियानाला कोल्हापूरकरांनी चांगली साथ व सहभाग नोंदविला आहे. कोल्हापूरकरांच्या सहाभागानेच आपण हे अभियान यशस्वी करु शकलो. यानंतर त्यांनी सर्वांना स्वच्छतेची शपथ दिली. पोलिस अधिक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, या अभियानामुळे शहर स्वच्छ होते. येथून पुढील स्वच्छता मोहिमेत पोलिसदलही सहभागी होईल.
सदरची स्वच्छता मोहिम रंकाळा टॉवर, तांबट कमान, इराणी खण, यल्लामा मंदीर, महालक्ष्मी मंदीर, शाहू समाधी परिसर, पंचगंगा घाट परिसर, शिवाजी विदयापीठ मेनरोड, कोटीतीर्थ तलाव, रेल्वे स्टेशन समोरील संपूर्ण परिसर, राजाराम बंधारा, तावडे हॉटेल ते मार्केट यार्ड मेनरोड परिसर येथे करण्यात आली. त्याचप्रमाणे शहरातील सर्व हेरिटेज वास्तू महापालिकेची कार्यालयांचीही स्वच्छता करण्यात आली.
स्वरा फौंडेशनच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे वृक्षरोपन करण्यात आले. त्यानंतर दसरा चौक व पंचगंगा नदी घाट परिसराची स्वच्छता केली. यावेळी क्रेडाईचे अध्यक्ष विद्यानंद बेडेकर, आर्किटेक असोसिएशनचे अजय कोराणे, विकी महाडिक, डायरेक्टर प्राजक्ता माजगावकर, अध्यक्ष सविता पाडळकर, उपाध्यक्ष अमृता वास्कर, पियुष हुलस्वार, फैजाण देसाई, डॉ. अविनाश शिंदे, आयुष्य शिंदे, साक्षी गुंडकल्ली, मानसी कांबळे, धर्मराज पाडळकर, विश्वजीत पाटील, सागर कांबळे, संघपाल कांबळे आदी उपस्थित होते. वृक्षप्रेमी वेलफेअर ऑर्गनायझेशन यांच्यावतीने ऐतिहासिक दसरा चौकाची स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. यावेळी वृक्षप्रेमी संस्थेचे अध्यक्ष अमोल बुड्ढे, सतीश कोरडे, विकास कोंडेकर व सदस्य तसेच मोठ्या संख्येने महापालिका कर्मचारी उपस्थित होते.