हॉकी स्टेडियमजवळ १२० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर लवकरच

• सामाजिक बांधिलकीतून महाडिक परिवाराचा उपक्रम 
कोल्हापूर • प्रतिनिधी
      माजी खासदार धनंजय महाडिक यांनी कोरोनाच्या संकटात पुन्हा एकदा सक्रीय मदत मोहिम सुरू करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी हॉकी स्टेडियमजवळ महापालिकेच्या एका इमारतीमध्ये तब्बल १२० बेडचे सुसज्ज कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे. येथील रूग्णांसाठी उपचार, नाष्टा-भोजन आणि सर्व सुविधा मोफत असणार आहेत.
       विशेष म्हणजे सर्वच १२० बेड ऑक्सिजनयुक्त असणार आहेत. शिवाय लहान मुलांसाठी या सेंटर मध्ये सुमारे २० बेड राखीव ठेवले जातील. तर विशेष बालरोग तज्ञांकडूनही लहान मुलांवर उपचार केले जातील. भाजप आणि ताराराणी आघाडीच्या सहयोगातून, महाडिक परिवाराच्यावतीने हे कोविड सेंटर लवकरच कार्यान्वित होणार आहे.
      कोल्हापूर जिल्हयातील कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. रूग्णांना बेड मिळत नाहीत. अशावेळी महाडिक परिवाराने पुढाकार घेवून, महापालिकेच्या सहकार्याने, कोरोना केअर सेंटर सुरू करण्याचे निश्‍चित केले आहे. त्यासाठी हॉकी स्टेडियम समोरची, महापालिकेच्या ताब्यातील एक ५ मजली नवी कोरी इमारत उपयोगात आणली जाणार आहे. सोमवारी माजी खासदार धनंजय महाडिक यांनी या इमारतीची पाहणी केली. यावेळी सत्यजीत कदम, विजय सुर्यवंशी, किरण नकाते, संग्राम निकम, महेश वासुदेव, अमृत शहा, शिवप्रसाद घोडके, मनोज नलवडे उपस्थित होते.
    या इमारतीमध्ये १२० बेडचे सुसज्ज कोरोना केअर सेंटर सुरू केले जाणार आहे. हे सर्व बेड ऑक्सिजनयुक्त असतील. तर त्यापैकी २० बेड लहान मुलांसाठी राखीव असतील. विनाखंड ऑक्सिजन पुरवठा होण्यासाठी येथे जंम्बो ड्युरा सिलेंडरची व्यवस्था केली जाणार असून, पाच बेडसाठी व्हेंटीलेटरचीही उपलब्धता असेल. येथे दाखल होणार्‍या सर्व रूग्णांवर तज्ञ डॉक्टरांकडून मोफत औषधोपचार होतील, तर रूग्णांना मोफत नाष्टा- भोजन मिळेल. भाजप- ताराराणी आघाडीच्या सहकार्यातून, महाडिक परिवाराकडून हे १२० बेडचे कोरोना केअर सेंटर येत्या आठवड्यात कार्यान्वित होणार आहे.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *