केडीसीसी बँकेला १४७ कोटी ढोबळ नफा: मंत्री हसन मुश्रीफ


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला (केडीसीसी ) १४७ कोटी रुपये ढोबळ नफा झाल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष व ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.  ठेवीमध्ये १,३८७ कोटींची वाढ होवून बँकेकडे ७,१२८ कोटी रुपये ठेवी झाल्या आहेत, असेही मंत्री श्री. मुश्रीफ यांनी सांगितले. शेतकऱ्याचा कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना भरपाई देण्यासाठी लवकरच निविदा मागवून विमा योजना सुरू करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.      
       कोल्हापुरात बँकेच्या केंद्र कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत मंत्री हसन मुश्रीफ यांनी ही माहिती दिली. यावेळी माजी खासदार श्रीमती निवेदिता माने, पी. जी. शिंदे, अनिल पाटील, आर. के. पोवार, विलासराव गाताडे, बाबासाहेब पाटील -आसुर्लेकर, सर्जेराव पाटील- पेरीडकर,  प्रताप उर्फ भैय्या माने, असिफ फरास आदी संचालक व  मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने उपस्थित होते.
      यावेळी श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, सहा वर्षांपूर्वी संचालक मंडळ सत्तेवर आले. त्यावेळी १३१ कोटीचा संचित तोटा  व २,८९० कोटी इतक्या ठेवीही कमी होत्या. अशा परिस्थितीत सर्व ग्राहकांनी, शेतकऱ्यांनी, सभासदांनी, संचालक मंडळाने व अधिकारी -कर्मचार्यांनी प्रचंड विश्वास दाखवला.  खर्चात काटकसर व पारदर्शीपणाने कारभार करीत वसुलीसाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता काम केल्यानेच बँकेला हे फळ मिळाले आहे. देशात नंबर एक असा या बँकेचा लौकिक वाढवू शकलो व प्रगती करू शकलो, याचा मनापासून आनंद आहे. उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करुन ही बँक देशात अव्वल बनली आहे.
      ते पुढे म्हणाले, या वर्षी ३० कोटी रुपये इन्कमटॅक्स भरावा लागणार होता. परंतु आयकर कायद्यातील तरतुदीनुसार गुंतवणूकीच्या तरतुदी करून १२ कोटी इन्कमटॅक्स वाचवू शकलो. डिजिटल बँकिंगमध्ये बँकेने १००% प्रगती करून ग्राहकांना हव्या त्या सगळ्या सुविधा देण्याचे काम पूर्ण केले आहे. बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा नफ्यात असल्याचे सांगतानाच श्री. मुश्रीफ म्हणाले, खेळते भांडवल १,५२३ कोटी रुपयांनी वाढले आहे. निव्वळ एन.पी.ए. फक्त २.२० टक्के व सी.आर.ए.आर. चे प्रमाण १२.२५ टक्के आहे.
      चालू आर्थिक वर्षासाठी दहा हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट व दोनशे कोटी नफ्याचे उद्दिष्ट आहे, असेही श्री. मुश्रीफ म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *