कोल्हापूर • (जिमाका) जिल्ह्यातील इयत्ता १ली ते १२ वीच्या शाळा २४ जानेवारी २०२२पासून सुरु करण्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक २१ जानेवारी २०२२ रोजी आयोजित करण्यात आलेली होती. बैठकीमध्ये झालेली चर्चा व घेण्यात आलेल्या निर्णयानुसार जिल्ह्यातील इयत्ता १ली ते १२वीच्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये मंगळवार दि. २५ जानेवारी २०२२ पासून सुरु करण्यास खालील अटी व शर्तीस अधीन राहून परवानगी देण्यात येत असल्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी दिले. 1. दि. २०/१/२०२२ रोजीच्या परिपत्रकातील सर्व अटी-शर्तींचे पालन करणे बंधनकारक राहिल. परंतु दर ४८ तासांनी RTPCR तपासणी न करता ज्यांचे दोन्ही लसीकरण पूर्ण झाले आहेत व कोरोनाची लक्षणे नाहीत अशाच शिक्षक व कर्मचाऱ्यांनी कनिष्ठ महाविद्यालये व शाळेमध्ये उपस्थित रहावे. कारोनाची लक्षणे असणाऱ्या प्रत्येक शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थ्याने स्वत:ची RTPCR चाचणी आवर्जून करावी. 2. ज्या गावांमध्ये / शहरांमध्ये (कोल्हापूर शहर वगळून), २०११ च्या जनगणनेनुसार १ टक्के लोकसंख्या किंवा १०० यापैकी जे कमी असेल एवढे कोरोना रुग्ण असतील तेथील शाळांच्या / कनिष्ठ महाविद्यालयांच्या शाळा व्यवस्थापन समित्यांनी / पालक शिक्षक समित्यांनी तात्काळ बैठक घेवून खालील पैकी एक पर्याय निवडूनच शाळा / कनिष्ठ महाविद्यालये चालवावी. i. प्रत्येक वर्गात ५० टक्के विद्यार्थी एक दिवस आड बोलावणे आणि प्रत्येक शैक्षणिक घटक या दोन्ही गटांना शिकविणे. ii. विद्यार्थ्यांना दोन वर्गांमध्ये समसमान विभागून बसविणे आणि उपलब्ध सर्व शिक्षकांचा एकत्रित वापर करुन अद्यापन करणे. यासाठी एका सत्रात एरवी भरणारी शाळा वर्ग खोल्यांच्या उपलब्धतेप्रमाणे दोन सत्रात बोलवावी लागू शकेल व शिक्षकांच्या दैनंदिन तासिका वाढू शकतील. iii. शाळा पूर्णपणे ऑनलाईन सुरु ठेवणे किंवा किमान ५० टक्के विद्यार्थी ऑनलाईन असतील याची खात्री करुन शाळा / कनिष्ठ महाविद्यालये ऑनलाईन तसेच ऑफलाईन सुरु ठेवणे. 3. गावांमध्ये / शहरांमध्ये कंटेनमेंट झोन मधील शाळा / कनिष्ठ महाविद्यालये बंद राहतील व कंटेनमेंट झोन मधील विद्यार्थ्यांना शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवू नये. तसेच कोरोनाची लक्षणे असणाऱ्या विद्यार्थी, शिक्षक व इतर कर्मचारी यांना शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवू नये. 4. कोरोना बाधीत / कोरोनाची लक्षणे असणाऱ्या व्यक्तींच्या घरातील विद्यार्थ्यांनी शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात येवू नये तसेच अशा विद्यार्थ्यांना शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश देवू नये. 5. दि.२४/१/२०२२ रोजी सर्व शाळा व्यवस्थापन समित्यांनी / पालक शिक्षक समित्यांनी या आदेशाप्रमाणे निर्णय घ्यावा व शासन निर्णयाप्रमाणे सर्व अनुपालनाची खात्री करावी. 6. वय वर्ष १५-१८ वयोगटातील विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण सत्र दि.१०/२/२०२२ पर्यंत आपापल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयात आयोजित करावे आणि विद्यार्थ्यांना लसीकरण करुन घेण्यास प्रात्साहित करावे. 7. तालुका आरोग्य अधिकारी व गट शिक्षण अधिकारी यांनी रोज संध्याकाळी कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेवून या आदेशाप्रमाणे त्यांच्या अधिनस्त शाळांमध्ये मुद्दा क्र. 2 च्या अनुपालनासाठी योग्य आदेश निर्गमित करावेत आणि त्यांच्या अंमलबजावणीची खात्री करावी. ज्या गाव / शहरांमध्ये कोरोना प्रादुर्भाव गंभीर होत आहे, तेथील शाळा / कनिष्ठ महाविद्यालये यांच्यासाठी स्वतंत्र आदेश निर्ममित करण्यात येतील. 8. शाळेत / कनिष्ठ महाविद्यालयात प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना जास्तीत जास्त ५० व्यक्तींनाच उपस्थित राहणेस परवानगी असेल. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथ रोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल. ——————————————————- ReplyForward