कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत विद्यापीठाला ब्रिटिश कौन्सिलकडून ”आपत्ती व्यवस्थापन आणि रिकव्हरी” हा संयुक्त पदव्युत्तर अभ्यासक्रम राबविण्यासाठी २ कोटींचे अनुदान प्राप्त झाले आहे. भारतातून ही संधी फक्त तीन विद्यापीठाला मिळाली आहे, त्यामध्ये संजय घोडावत विद्यापीठ आणि एसआरएम विद्यापीठ यांचा समावेश आहे. टीसाइड युनिव्हर्सिटी युके व संजय घोडावत विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने हा अभ्यासक्रम राबविला जाणार असल्याची माहिती घोडावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.अरुण पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविली आहे.
याबाबत सविस्तर बोलताना डॉ. अरुण पाटील म्हणाले की, ब्रिटन आणि भारताच्या संबंधामध्ये शैक्षणिक देवाण घेवाण व्हावी या उद्देशाने गोइंग ग्लोबल पार्टनरशिप हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत भारतातील नामवंत विद्यापीठांनी या अनुदानासाठी अर्ज सादर केला होता परंतु ब्रिटनने लावलेल्या शैक्षणिक निकषातून भारतातून तीनच विद्यापीठाची निवड करण्यात आली आहे. यामध्ये आमच्या विद्यापीठाची निवड ही आमच्यासाठी अभिमानास्पद बाब आहे. आपत्ती व्यवस्थापन हा सध्याचा ज्वलंत विषय असून कोरोनासारखी वैश्विक आपत्ती असो वा महापुरासारखी आपत्ती असो यावर कशी मात करायची याचे व्यवस्थापन शिकविणारा हा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रम आहे. भविष्यात अशा पद्धतीचे विविध अभ्यासक्रम व उपक्रम राबवून विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त करून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू.
यासाठी एज्यु अलायन्स एज्युकेशनल कन्सलटंटचे संचालक आनंद हंदूर यांचे विशेष सहकार्य लाभले.
या यशाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————————-