पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव:मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love

    
 कोल्हापूर • प्रतिनिधी
     गोकुळ दूध संघासाठी आमचे ज्येष्ठ मित्र आमदार पी. एन. पाटील यांच्याकडून तीन जागांचाच प्रस्ताव आला आहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. दरम्यान, बैठकीमध्ये झालेल्या अनेक गोष्टी खाजगी स्वरूपाच्या असल्यामुळे त्या जाहीर करणार नाही, असेही मंत्री मुश्रीफ यांनी स्पष्ट केले आहे.
      गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या संदर्भाने सुरू असलेल्या समझोता एक्सप्रेसच्या विषयावरून मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या पत्रकात हा खुलासा केला आहे.
      या पत्रकात मंत्री श्री. मुश्रीफ यांनी पुढे म्हटले आहे, माझ्यासह आमदार पी. एन. पाटील व पालकमंत्री सतेज पाटील आम्ही तिघेही सत्तारुढ महाविकास आघाडीचे घटक आहोत. गोकुळ दूध संघासह इतर सर्व संस्थांच्या निवडणुकीमध्ये एकत्र येऊन त्या लढवाव्यात, हा माझा प्रामाणिक हेतू आहे. यामध्ये संघर्ष झाला तर जिल्ह्याच्या विकासाला खीळ बसेल, या प्रामाणिक भावनेतून एकत्र येण्याच्या माझ्या विनंतीस मान देऊन आमदार पी. एन. पाटील यांनी प्रतिसाद दिला व चार बैठका झाल्या. सत्तेत ते असल्यामुळे ते किती जागा देतात, हीच मागणी मी सातत्याने केली.
     दरम्यान, रविवारी जिल्हा बँकेमध्ये झालेल्या चर्चेमध्ये आमदार पी. एन. पाटील यांनी स्पष्टपणे माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे चारच उमेदवार असून ते आम्ही बदलणार नाही, असे सांगितले. त्यांनी असेही सांगितले की कागलमध्ये तुम्हाला घेऊ व माजी आमदार के. पी. पाटील यांना एक जागा देऊ. यावर मी पालकमंत्र्यांचा विषय काढला. त्यावर त्यांनी एखादी जागा त्याना देऊ, असे सांगितले. यावर मी जे काही भाष्य केले ते मी सार्वजनिक करणार नाही. मी चर्चा करून तुम्हाला कळवतो, असे सांगितले.
     तसेच माझ्या बैठकीच्या बाहेरच्या दालनामध्ये आमदार पी. एन. पाटील यांचे सहकारी शिवाजी कवठेकर व  सदानंद पाटील – गडहिंग्लज  ही बिचारी मी व आमदार पी. एन. पाटील यांनी एकत्र यावे, ही त्यांची प्रामाणिक भावना असल्यामुळे ते प्रयत्न करत होते. त्यांच्यापुढे आमदार पी. एन. पाटील यांचा प्रस्ताव मी जसाच्या तसाच सांगितला. तेथून शांतिनिकेतन स्कूलमध्ये पालकमंत्री सतेज पाटील यांची भेट घेऊन सदर भेटीची माहिती दिली. यावेळी पालकमंत्री श्री. पाटील संतप्त झाले व त्यांनी आपण यामध्ये येणार नाही. तुम्ही कोणाबरोबर जावयाचे तो निर्णय घ्या, असे सांगितले.
      दरम्यान, गोकुळ दूध संघाच्या गेल्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मते मिळाली नाहीत, असे सत्तारूढ संचालक मंडळाचे म्हणणे आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये मल्टीस्टेट व गोकुळ दूध संघाच्या अनेक विषयावर आम्ही एकत्र काम केले आहे. त्यामुळे पालकमंत्री श्री. पाटील यांना घेऊनच मला निर्णय घ्यावा लागेल, असेही मी आमदार पी. एन. पाटील यांचेसमोर अनेक बैठकांमध्ये स्पष्ट केले आहे. बैठकीमध्ये अनेक चर्चा झाल्या. परंतु त्या खाजगी असल्यामुळे मी त्या सार्वजनिकरीत्या जाहीर करणार नाही. ती आचारसंहिता मी निश्चितपणे पाळीन. कारण, एका चांगल्या भावनेने व प्रामाणिकपणाने आम्ही दोघांनी चर्चा केल्या होत्या. आमच्या मैत्रीमध्ये अडचण येण्याचे काहीच कारण नाही.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!