३० मावळ्यांची आग्रा ते राजगड गरूडझेप मोहिम

Spread the love

• कोल्हापूरच्या सूरज ढोलींचा सहभाग
कोल्हापूर • प्रतिनिधी
     छत्रपती शिवरायांनी औरंगजेबाच्या कैदेतून गरुडझेप घेतली व ते सुखरूप स्वराज्यात परतले. यास आजमितीस ३५५ वर्षे झाली. ही घटना म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेली गरुडझेप होती. आजही या ऐतिहासिक घटनेमुळे मनात प्रेरणेची, शौर्याची आणि धैर्याची लहर दौडते. शेकडो वर्षे पारतंत्र्यात, परकिय जोखडाखाली पिचलेल्या जनतेला स्वातंत्र्याचा मंत्र देत स्वराज्याची मुहूर्तमेढ महाराजांनी रोवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या झुंजार लढ्याची ही प्रेरणा जिवंत ठेवत महाराष्ट्रातील विविध भागातील ३० मावळे  आग्रा ते राजगड ही गरूडझेप घ्यायला सज्ज झाले आहेत. यामध्ये मारुती गोळे (आबा) यांच्या नेतृत्वाखाली पुणे, मावळ, मुळशी, दौंड व कोल्हापूर या भागातून हे मावळे सहभागी झाले आहेत. कोल्हापुरातून हिल रायडर्सचे शिलेदार व शंभुराजे मर्दानी विकास मंचचे अध्यक्ष सूरज ढोली सहभागी झाले आहेत.
     दरम्यान, या मोहिमेत सहभागी असलेले सूरज ढोली यांना छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी प्रमोद पाटील, भोला यादव, विनोद कांबोज, युवराज साळोखे, सुभेदार आर.एस.पाटील, संजय जांभीलकर, स्नेहल रेडेकर, संदीप कोळेकर, प्रसाद जाधव, सचिन नरके, वैभव जाधव, ऋतुराज माने, अनिल पाटील, कृष्णा सोरटे आदी उपस्थित होते.
     आग्रा ते राजगड हे बाराशे किलोमीटरचे अंतर हे मावळे १७ ते २९ ऑगस्ट या बारा दिवसात चार राज्यातून ५८ शहरातून रोज शंभर किलोमीटर धावत पूर्ण करणार आहेत. आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला जलाभिषेक करण्यात येणार आहे. यासाठी विविध गड-किल्ले व शौर्यस्थळांवरील जल संकलन केले आहे.
      गरूडझेप मोहिमेत सहभागी असलेले सूरज ढोली हे मर्दानी खेळ विशारद आहेत. ते या मोहिमेतून विविध शहरांमध्ये पोहोचल्यावर शिवकालीन शस्त्रांची व मर्दानी खेळाची प्रात्यक्षिके सादर करून या खेळाचा प्रसार करणार आहेत.
       गरूडझेप मोहिमेतील शिवज्योत राजगडावर पोहोचल्यानंतर राजगडावरून सातारा-कराड मार्गे कोल्हापूरमध्ये शिवज्योत आणण्यात येणार आहे. कोल्हापूरमध्ये स्वागत करून ती शिवज्योत कावळा नाका चौकातील छत्रपती ताराराणी पुतळा येथून व्हिनस कॉर्नरवरून छत्रपती राजाराम महाराज पुतळा, दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज पुतळा मार्गे छत्रपती शिवाजी चौकात येईल. याठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीत शिवज्योतीचे स्वागत होऊन कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक तालुका व गडकोटांवर ज्योती जातील. त्याचे नियोजन कोल्हापुरातील हिल रायडर्स ॲडवेंचर्स फौंडेशन, शंभुराजे मर्दानी खेळ विकास मंच, समिट ॲडव्हेंचर्स, व्हरसाईट ॲडव्हेंचर्स, कोल्हापूर ॲडव्हेंचर्स ॲण्ड माऊंटनिअरींग फौंडेशन, धर्मवीर संभाजीराजे क्रीडा मंडळ, पन्हाळा युवा प्रतिष्ठान, भवानी फौंडेशन, योद्धा फौंडेशन या व इतर संस्था सहभागी होणार आहेत.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!