बाल कल्याण संकुलातील ३६ मुलांची कोरोनावर मात


कोल्हापूर • प्रतिनिधी
      बाल कल्याण संकुलातील ३६ मुलांनी कोरोनावर मात केली. १४ दिवसांच्या उपचारानंतर ही मुले बाल कल्याण संकुलातील आपल्या घरट्यात पोचली. शिवाजी विद्यापीठातील कोव्हिड केअर सेंटरमधून कोरोनामुक्त झाल्यानंतर या मुलांनी टाटा, बाय-बाय करत कोव्हीड सेंटरमधील डॉक्टर आणि नर्सिंग कर्मचाऱ्यांचा निरोप घेतला.
      बाल कल्याण संकुलातील एकूण ३६ मुले कोरोना पॉझिटिव्ह आल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. ९ मे रोजी १३ मुलांना कोरोनाच्या संसर्ग झाला होता. तर त्यानंतर इतर मुलांची चाचणी केल्यानंतर पुन्हा २३ मुले कोरोना पॉझिटिव्ह आढळली होती. या मुलांना महापालिकेच्या शिवाजी विद्यापीठातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. चौदा दिवसानंतर आज या ३६ मुलांनी कोरोनावर यशस्वी मात केली. आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
      बाल कल्याण संकुलच हे या मुलांचे आई आणि वडील आहेत. ही मुले या संकुलात उत्साहात खेळतात व  बागडतात मात्र कोरोनाच्या लागण मुलांना झाल्यानंतर या मुलांच्या मदतीला अनेकजण धावले. तर कोल्हापूर महापालिकेचे उपायुक्त रविकांत अडसूळ यांनी तत्परता दाखवून या मुलांना आणि दोघा कर्मचाऱ्यांना केएमटी बसद्वारे विद्यापीठातील कोव्हीड केअर सेंटरमध्ये दाखल केले होते. यावेळी या मुलांवर वैद्यकीय अधिकारी डॉ.सुशांत रेवडेकर आणि नोडल ऑफिसर डॉ. निलेश लांब यांनी विशेष दक्षता घेऊन उपचाराच्या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या.
      संवेदना फाउंडेशन आणि जैन सेवा संघ यांच्या प्रयत्नातून एक दिवसाआड या सर्व मुलांसाठी कोव्हीड केअर सेंटरमध्ये  गाणी, गिटारवादन, लेझीम, तबलावादन असे करमणुकीचे कार्यक्रम घेतले. त्याचबरोबर श्वसनाचे व्यायाम याविषयी मार्गदर्शन केले. उपचाराच्या काळात ही मुले मूल जणू या सेंटरचा अविभाज्य अंग होऊन गेली होती. या मुलांनी इथल्या सर्व कर्मचाऱ्यांना लळा लावला. आज या मुलांनी कोरोनवर मात केली. त्यानंतर त्यांना त्यांचे घर असलेल्या बाल कल्याण संकुलात पाठविण्यात आले यावेळी या मुलांनी इथल्या कर्मचाऱ्यांना बाय काका, बाय मॅडम, बाय सर, बाय सिस्टर अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त करत कोव्हीड सेंटरमधून बाहेर पडली. बाल कल्याण संकुल हे या मुलाचे सर्वस्व असल्याने यावेळी या मुलांना निरोप देतांना उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू वाहत होते. सर्वच ३६ मुलांनी कोरोनावर मात केल्यामुळे बाल कल्याण संकुलातील कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *