जिल्ह्याच्या सन २०२१-२२साठी ३७५ कोटींच्या प्रारूप आराखड्यास राज्यस्तर समितीची मंजुरी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण आराखड्यात शुक्रवारी तब्बल १०४.१५ कोटी रुपयांची वाढ उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी केली. जिल्ह्याच्या  सर्वसाधारण आराखड्यासाठी २७०.८५कोटी रुपयांची मर्यादा ठरवून देण्यात आली होती. आता ती वाढवून ३७५ कोटी रुपयांच्या जिल्हा वार्षिक योजनेच्या सर्वसाधारण प्रारूप    आराखडा मंजूर करण्यात आला.
     आज पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात जिल्हा वार्षिक आरखड्यासंदर्भात उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी बैठक घेतली. त्यावेळी या वाढीव प्रारूप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. यावेळी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर, वित्त व नियोजन राज्यमंत्री शंभूराज देसाई, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि अधिकारी उपस्थित होते.
      सन २०२१-२२ करिता राज्य शासनाकडून कोल्हापूर जिल्ह्याकरिता जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण करिता रू. २७०.८५कोटी एवढी नियतव्यय मर्यादा कळविण्यात आलेली होती. त्यानुसार या मर्यादेत जिल्हा वार्षिक योजनेचा आराखडा जिल्हा नियोजन समितीमार्फत मंजूर करण्यात आला होता. दरम्यान आज उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे जिल्हाधिकारी श्री देसाई यांच्यासह लोकप्रतिनिधींनी हा निधी वाढवून देण्याची विनंती केली. त्यावर, श्री. पवार यांनी जिल्ह्याच्या एकूण आराखड्यात तब्बल १०४.१५ कोटी रुपयांची वाढ करीत ३७५ कोटी रुपयांचा आराखडा मंजूर करण्यात येत असल्याचे सांगितले.
     उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले,  कोरोनामुळे आर्थिक संकट असतानाही जिल्हा वार्षिक योजनेच्या निधीत कपात न करता चालू वर्षी १०० टक्के निधी उपलब्ध करून देण्यात आला. याशिवाय, स्थानिक विकास निधी, डोंगरी विकास निधी, यासाठीचा निधीही पूर्णपणे देण्यात आला आहे. त्यामुळे विभागांनी उपलब्ध निधी तातडीने खर्च करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.
———————————————– 

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!