कोल्हापूर • प्रतिनिधी
धरणगुत्ती गावाकरीता कृष्णा नदीवरून नळ पाणीपुरवठा योजनेसाठी जल जीवन मिशन योजने अंतर्गत ४ कोटी ४३ लाखाचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती ग्रामपंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान सदस्य शेखर पाटील यांनी दिली. यावेळी सरपंच सौ. विजया कांबळे, उपसरपंच जीवन रजपूत, सदस्य भालचंद्र लंगरे, मनोहर माळी, सुरेश आरगे, बाबासो कारंडे, ग्रामविकास अधिकारी चंद्रकांत केंबळे व सर्व सदस्य उपस्थित होते.
धरणगुत्ती या गावची अंदाजे लोकसंख्या १५,००० इतकी असून दिवसेंदिवस नागरीकरणामुळे लोकसंख्येत भर पडत चालली आहे. ग्रामपंचायत धरणगुत्ती आपल्या गावातील नागरिकांना मुलभूत व पायाभूत सुविधा मिळाव्यात यादृष्टीने नेहमीच प्रयत्नशील असते. गावातील नागरिकांना पिण्यासाठी स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे या हेतूने यापूर्वी ग्रामपंचायतीने भारत निर्माण योजने अंतर्गत रुपये ९९ .०० लाख इतक्या निधीची पाणीपुरवठा योजना कार्यान्वीत केली होती. तद्नंतर वाढती लोकसंख्या व वाढीव वस्ती लक्षात घेवून ग्रामपंचायतीने सन २०१२ मध्ये राष्ट्रीय पेयजल योजने अंतर्गत रक्कम रूपये २ कोटी ७२ लाख इतक्या रक्कमेची नळ पाणी पुरवठा योजना गावासाठी कार्यान्वीत केली. सदरची योजना गेली १० वर्षे अतिशय चांगल्या पध्दतीने व सातत्यपुर्णरित्या कार्यान्वीत आहे.
सद्या ग्रामपंचायत धरणगुत्तीने दरडोई खर्चाचे निकष लक्षात घेवून केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त योजने अंतर्गत ग्रामीण भागातील प्रत्येक कुटुंबासाठी स्वच्छ व मुबलक पाणी देण्यासाठी जल जीवन मिशन योजना सुरू केली आहे. या योजने अंतर्गत रूपये ४ कोटी ४३ लाख इतक्या निधीची नळ पाणीपुरवठा योजना धरणगुत्ती गावासाठी मंजूर झाली आहे. सदर योजना कृष्णा नदी स्रोत धरून मंजूर केली आहे. सध्या यामुळे गावातील नागरिकांना पंचगंगा नदीचे प्रदूषित पाणी वापरावे लागते त्याऐवजी या नविन योजनेमुळे गावातील नागरिकांना कृष्णा नदीचे स्वच्छ व मुबलक पाणी मिळणार आहे.
सदर योजना मंजूर करण्यासाठी पालकमंत्री सतेज पाटील, खा. धैर्यशील माने, माजी खा. राजू शेट्टी, दत्त उद्योग समुहाचे चेअरमन गणपतराव पाटील, माजी आ. उल्हासदादा पाटील, जि.प. सदस्य राजवर्धन निंबाळकर तसेच ग्रामपंचायतीकडील सर्व पदाधिकारी व गावातील नागरिकांचे सहकार्य लाभले, अशी माहिती विद्यमान सदस्य शेखर पाटील यांनी दिली.
——————————————————-