महापालिका पथकाकडून २१२ लोकांवर कारवाई : ७४ हजार दंड वसूल


कोल्हापूर • प्रतिनिधी 
     कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस पथकाकडून विनामास्क, सोशल डिस्टन्स व सार्वजनिक ठिकाणी थुंकल्याबद्दल २१२ लोकांवर करवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ७४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.
     कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे, हॅण्डग्लोज वापरणे, सार्वजनिक ठिकाणी न थुंकणे या प्रतिबंधक गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. मात्र शहरात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी प्रतिबंधक गोष्टींचा भंग केल्याबददल महानगरपालिका, केएमटी आणि पोलिस प्रशासनाच्या पथकाकडून विनामास्क १९९ लोकांकडून ६०२००, सोशल डिस्टन्स १२ लोकांकडून १३५०० व १ तासनंतर आस्थापना सुरु ठेवल्याबद्दल १ व्यक्तिकडून १००० असे एकूण २१२ लोकांकडून ७४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. केवळ दंड वसूल करणे हा महापालिका प्रशासनाचा उद्देश नसून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे काटेकोर पालन करुन नागरिकांनी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.
      तसेच महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील १५ हॉलची तपासणी करण्यात आली. यावेळी जरगनगर, मार्केट यार्ड, ताराबाई पार्क, कावळा नाका येथील मंगल कार्यालयांना ३५०० रुपयांचा दंड करण्यात आला.
      शहरामध्ये गर्दी वाढत असल्याने नागरीकांनी दक्षता घेणे आवश्यक आहे. सण, समारंभ, धार्मिकस्थळे, भाजीमार्केट याठिकाणी नागरिकांनी नियमितपणे मास्कचा वापर करावा, सॅनिटाईजरचा वापर करावा तसेच सामाजिक अंतराचे पालन करावे, असे आवाहन महापालिका प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *