कोल्हापूर व सांगलीतील ९६ हजार शेतकऱ्यांनी वीजबिलाचे १०३ कोटी भरले

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शेतकरी बांधवानों ! कृषिपंपाची ५० टक्के थकबाकी भरा, आपलं वीज बिल कोरं करा.. या महावितरणच्या आवाहनास प्रतिसाद देत कृषी धोरण २०२० अंतर्गत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील ९६ हजार ४३२ कृषिपंप ग्राहकांनी १०३ कोटी ७० लक्ष रुपये वीजबिल थकबाकी भरली असून तेवढीच रक्कम माफ झाली आहे. महावितरणकडून कृषी ऊर्जा पर्व अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या जनजागृती उपक्रमांचे हे फलित आहे. तरी शेतकऱ्यांनी थकबाकी मुक्तीसाठी कृषी धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता प्रभाकर निर्मळे यांनी केले आहे.                     
    कोल्हापूर जिल्ह्यात ६४ हजार ६४९  कृषिपंप ग्राहकांनी ४३ कोटी ७० लक्ष तर सांगली जिल्ह्यात ३१ हजार ७८३ कृषिपंप ग्राहकांनी ६० कोटी रूपयांच्या थकबाकीचा भरणा केला आहे. चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित सर्व उच्चदाब, लघुदाब कृषिपंप ग्राहक आणि उपसा जलसिंचन योजना सुधारीत मुळ थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून उर्वरीत ५० टक्केच्या माफी योजनेचा लाभ घेऊ शकतात. एक ते तीन वर्षासाठी टप्प्याने योजनेत सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रक्कमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या ३० टक्के तर तिसऱ्या वर्षात २० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. कृषिपंप ग्राहकांनी चालू वीजबिले भरणे आवश्यक राहील.
    कृषी धोरणानुसार निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफीनंतर कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात ३ लक्ष ८५ हजार कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ४८६ कोटींची सुधारीत थकबाकी आहे. कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ९२८ ग्राहकांकडे ४३१ कोटी रूपये तर सांगलीत २ लक्ष ३९ हजार ३३० ग्राहकांकडे १०५५ कोटी रूपये थकबाकी आहे. कृषिपंपाच्या सुधारीत थकबाकीतील ५० टक्के रक्कम भरणा केल्यास दोन्ही जिल्ह्यात मिळून ७४२ कोटी रूपये माफ होणार आहेत.
     कृषी ग्राहकांना वीज बिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील मराठी व इंग्रजीमध्ये महावितरणने पुढील वेबपोर्टलवर https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयात संपर्क साधावा

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!