कोल्हापूर • प्रतिनिधी
महाराष्ट्रातील प्रबोधन, पुरोगामी, परिवर्तनवादी, कष्टकरी, शेतकरी, कामगार चळवळींचे अग्रणी ज्येष्ठ नेते, रयत शिक्षण संस्थेचे माजी चेअरमन प्रा. डॉ.एन.डी. पाटील हे सोमवारी वयाच्या ९३व्या वर्षी कालवश झाले. त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
प्रा. एन. डी. पाटील यांचे पूर्ण नाव नारायण ज्ञानदेव पाटील असे होते. मात्र, एन.डी. या नावाने संपूर्ण महाराष्ट्र त्यांना ओळखत होता. त्यांचा जन्म ढवळी (नागाव जि.सांगली) येथे अशिक्षित शेतकरी कुटुंबात झाला होता. सीमा लढ्याचे प्रणेते म्हणूनही त्यांना ओळखले जाते.
डॉ. एन. डी. पाटील यांच्या पार्थिवावर उद्या मंगळवारी (दि.१८) दुपारी दोन वाजता कसबा बावडा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यापूर्वी सकाळी आठ वाजल्यापासून दुपारी बारा वाजेपर्यंत डॉ. एन. डी. पाटील यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी सदर बाजार – विचारे माळ येथील राजर्षी छत्रपती शाहू महाविद्यालयाच्या प्रांगणात ठेवले जाणार आहे. कोरोनाच्या नियमांमुळे अंत्ययात्रा निघणार नाही.
दरम्यान,ज्येष्ठ नेते प्रा एन. डी. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात यावे अशा सूचना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत.