कोल्हापूर • प्रतिनिधी
गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम बरेच वर्ष रखडले होते. या कामाच्या पूर्ततेसाठी आखरी रास्ता कृती समितीच्या माध्यमातून गेली अडीच वर्ष आंदोलनाच्या माध्यमातून पाठपुरावा चालू होता. या आंदोलनाला अखेर यश आले असून रस्त्याचे काम सुरू केले आहे.
गंगावेश ते शिवाजी पूल रस्त्याचे काम बरेच वर्षे रखडलेल्या अवस्थेत होते. रस्ता करण्यासाठी आखरी रास्ता कृती समितीच्यावतीने आंदोलन सुरू होते. आंदोलनप्रसंगी महापालिका प्रशासनाकडून वेळोवेळी आश्वासन दिले जात होते परंतु रस्ता मात्र होत नव्हता. अखेर गेल्या आठवड्यात कृती समितीने तीव्र आंदोलनाचा इशारा देऊन प्रशासनास आठ दिवसाची मुदत दिली. प्रशासनाने हि डेडलाईन पाळत सातव्या दिवशी रखडलेले ड्रेनेज व पाईपलाईनचे काम आखरी रास्ता मित्र मंडळाच्यासमोर काम सुरू केले. या कामाचा शुभारंभ भागातील ज्येष्ठ नागरिक भगवान बावडेकर यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून झाला. यावेळी कृती समितीचे किशोर घाटगे यांनी प्रशासनाने सुरू केलेल्या कामाबद्दल व पाठपुराव्याला सहकार्य केल्याबद्दल महापालिका प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांचे आभार मानले.
यावेळी कृती समितीचे राकेश पाटील, प्रकाश गवंडी, सुरेश कदम, रियाज बागवान आदींसह नागरिक उपस्थित होते.