कृषी पर्यटनात रोजगार निर्मितीची क्षमता: सुप्रिया करमरकर

Spread the love


• जिल्हयातील पहिले कृषी पर्यटन प्रशिक्षण उत्साहात
कोल्हापूर • (जिमाका)
      राज्य शासनाने कृषी पर्यटन धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीतून तरुण शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले आहे़. कुशल, अकुशल रोजगार निर्मितीची मोठी क्षमता कृषी पर्यटनात आहे. सध्या कृषी पर्यटन हा जगभरात वेगाने वाढणारा उद्योग ठरत आहे. कृषी पर्यटन हा पर्यावरणपूरक उद्योग असून शेती आणि शेतीशी संबंधित उद्योगांसाठी फायदेशीर आहे, असे प्रतिपादन पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर यांनी केले.
      राज्य शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या (पर्यटन विभाग) वतीने देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्र, बांदिवडे येथे जिल्हा स्तरीय कृषी पर्यटन प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले, यावेळी त्या बोलत होत्या. हे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीर कोल्हापूर जिल्हयातील कृषी पर्यटन केंद्रचालक आणि कृषी पर्यटन सुरु करण्यास इच्छूक असलेल्या शेतकऱ्यांसाठी घेण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानदेव वाकुरे होते.
      राज्य शासनाच्यावतीने कृषी पर्यटन धोरणाची अंमलबजावणी केल्यानंतर पर्यटन संचालनालयाच्यावतीने राज्यातील शेतकऱ्यांना कृषी पर्यटन केंद्र सुरु करण्यास परवानगी देण्यास सुरुवात केली आहे. कोल्हापूर जिल्हयातील ज्या शेतकऱ्यांनी कृषी पर्यटन केंद्र सुरू केली आहेत आणि ज्यांनी परवानगीसाठी अर्ज केले आहेत, त्या शेतकऱ्यांना कृषी पर्यटनाची संकल्पना कळावी. प्रत्यक्ष कृषी पर्यटन केंद्र कसे असावे हे पाहता यावे आणि शासनाच्या व बँकांच्या विविध योजनांची माहिती मिळावी यासाठी देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्रावर प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
       पर्यटन संचलनालयाच्या उपसंचालक सुप्रिया करमरकर म्हणाल्या, पुणे विभागातील पाच जिल्हयातील १९८ शेतकऱ्यांनी कृषी पर्यटनासाठी पर्यटन संचलनालयाकडे अर्ज केला होता. यापैकी ज्या शेतकऱ्यांनी कागदोपत्राची आणि नियम अटींची पुर्तता केली आहे, अशा ९० जणांना कृषी पर्यटन केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे़. निसर्गरम्य असलेल्या कोल्हापूर जिल्हयात कृषी पर्यटनाला चांगला वाव असल्याने जिल्हयात कृषी पर्यटन झपाट्याने वाढेल असा विश्वास यावेळी सुप्रिया करमरकर यांनी व्यक्त केला.
       यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना जिल्हा कृषी अधिक्षक ज्ञानदेव वाकुरे म्हणाले, वाढत्या शहरीकरणात नागरिकांचे जीवन ताण-तणावाचे, दगदगीचे होत आहे. रोजच्या धावपळीतून शांत, निवांत आणि निसर्गरम्य ठिकाणी जाण्याची ओढ प्रत्येकाच्या मनात असते, ही ओढच कृषी पर्यटनाचा पाया आहे. शेतीला जोडधंदा म्हणून कृषी पर्यटन एक सक्षम पर्याय म्हणून पुढे येऊ पाहत असुन शेतकऱ्यांना उत्पन्न, रोजगार आणि आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याचा व्यापक दृष्टिकोन कृषी पर्यटनात आहे.  कृषी पर्यटनासाठी कृषी विभागातील अनेक योजना फायद्याच्या आहेत.
       कृषी पर्यटन आणि वित्त पुरवठा या विषयावर मार्गदर्शन करताना कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मुख्याधिकारी डॉ.अशोक माने म्हणाले, कृषी पर्यटनासाठी पुणे जिल्हा बँक आणि सातारा जिल्हा बँकेकडून कर्ज दिले जाते. कृषी पर्यटन हा शेतकऱ्यांशी निगडीत आणि पुर्णपणे शेतीवर अवलंबून असल्याने पुणे आणि सातारा जिल्हा बँकेप्रमाणे कोल्हापूर जिल्हा बँकेकडूनही कृषी पर्यटनासाठी वित्त पुरवठा करण्यासाठी प्रयत्न करु.
      तुळशीच्या रोपाला पाणी घालून कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. यानंतर देवगिरी फार्म कृषी पर्यटन केंद्राचे सुखदेव गिरी आणि अ‍ॅड.निलांबरी गिरी यांनी कृषी पर्यटनाची संकल्पना सांगून पाहुण्यांसह उपस्थित शेतकऱ्यांचे स्वागत केले. दोन सत्रामध्ये आयोजीत या प्रशिक्षण शिबीरात ‘ग्रामीण लोकजीवन आणि पर्यटन’ विषयावर प्रो-ग्रामचे कृष्णराव माळी यांनी तर ‘कृषी पर्यटनाचे व्यवस्थापन आणि त्याचे मार्केटींग’ विषयावर कारवा हॉलीडेजचे वासिम सरकवास यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
       कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद पाटील यांनी केले तर चित्री कृषी पर्यटन केंद्राचे प्रा.अनिल मगर, अनबेला कृषी पर्यटनाचे अजिंक्य मोरे यांच्यासह इतर कृषी पर्यटन केंद्रचालकांनी अनुभव कथन केले. यावेळी पैसचे सदाशिव रेडेकर, अजिंक्य बेर्डे, योगेश भारती, प्रमोद पाटील, सचिन पाटील, धनश्रीदेवी घाटगे, राजश्री आमले, केतकी गुरव, तानाजी मोरे, नचिकेत ठाकूर यांच्यासह कोल्हापूर जिल्हयातील १०० हून अधिक शेतकरी उपस्थित होते.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!