अतिरिक्त ९५ कोटीच्या मागणीसह ३६६ कोटी प्रस्तावाच्या ठरावास मंजुरी

• निधी १०० टक्के खर्च करण्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश
  कोल्हापूर • (जि.मा.का.)
      शासनाकडे केलेली अतिरिक्त ९५ कोटीच्या मागणीसह ३६६ कोटी प्रस्तावाच्या ठरावास आज मंजुरी देण्यात आली. सर्व विभागांनी दिलेला निधी १०० टक्के खर्च करावा.  त्यानुसारच पुढील वर्षाचा निधी दिला जाईल, असे निर्देश पालकमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी आज दिले.
     जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री सतेज पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात झाली. बैठकीस सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, खा. प्रा. संजय मंडलिक, खा. धैर्यशील माने, आ. जयंत आसगावकर, आ. चंद्रकांत जाधव, आ. ऋतुराज पाटील, आ. राजेश पाटील, आ. राजू आवळे, आ. प्रकाश आवाडे, आ. प्रकाश आबिटकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण आदी उपस्थित होते.
     सुरुवातील पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते नुतनीकरण केलेल्या ताराराणी सभागृहाचे उद्घाटन करण्यात आले. यानंतर झालेल्या सभेत जिल्हा नियोजन अधिकारी विजय पवार यांनी सुरूवातीला सर्वांचे स्वागत करुन संगणकीय सादरीकरण केले. आमदार श्री. आवाडे यांच्या प्रश्नावर पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, इचलकरंजी, कोल्हापूर लक्ष्मीपुरी येथील पोलिसांच्या निवासस्थानाबाबत नुकत्याच झालेल्या मंडळाच्या बैठकीत तत्वत: मान्यता दिली आहे. जिल्हा नियोजन मधून त्यासाठी निधी देतोय. जिल्ह्यातील ३१ पोलीस ठाण्यापैकी १५ पोलीस ठाण्यांना अत्याधुनिक करण्याच्या दृष्टीकोनातून प्रत्येकी १५ लाखाचा निधी दिला आहे. चंदगड येथील जुने तहसिल कार्यालय पोलीस ठाण्यासाठी देण्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही ते म्हणाले.
   ग्रामपंचायतीमधील स्ट्रीट लाईट सुरु करण्याबाबत महावितरणचे अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी एकत्रित बैठक घेवून मार्ग काढावा. कोरोना काळात काम केलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासन सेवेत घेण्याबाबत प्राधान्य द्यावे, याबाबत शासनाला कळविले जाईल, असेही पालकमंत्री म्हणाले.
ऑप्टीकल फायबर, गॅस पाईप लाईन याबाबत रस्ते खुदाई  झालेल्या ठिकाणी इचलकरंजी प्रांताधिकाऱ्यांनी भेट देवून अहवाल सादर करावा, असे निर्देश देवून पालकमंत्री म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी दि. २७ जानेवारी रोजी या सर्व यंत्रणांची एकत्रित बैठक घ्यावी.
    आमदार श्री. आबिटकर यांनी मांडलेल्या सुचनेवर पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पुढच्या बैठकीला पाच विभागाच्या प्रमुखांनी सादरीकरण करुन झालेला निधी खर्च तसेच कामाचा आढावा सादर करावा. शेणापासून खत निर्मिती, फवारणी प्रकल्पाचा प्रस्ताव जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी मागवून तो मंजूर करावा.
     राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर म्हणाले, महापालिका हद्दीत हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बॉटनिकल गार्डन आणि सुसज्ज स्मारक व्हावे. त्यासाठी नाविन्यपूर्ण योजनेतून यावर्षी आणि पुढच्या वर्षी निधी द्यावा. यावर पालकमंत्री श्री. पाटील यांनी महापालिका आयुक्तांनी याबाबतचा सविस्तर प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश दिले.    
नाविन्यपूर्ण योजनेमधून जुना राजवाडा पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांनी राबविलेला सार्वजनिक घोषणा प्रणाली सर्वत्र राबविण्यात येणार आहे. याला सीसीटीव्हीची तरतूद करण्यात येणार असून टप्याटप्याने दोन – तीन वर्षात जिल्ह्यात सर्वत्र राबविली जाईल. यामध्ये पुराच्या गावांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
     जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी याबाबत माहिती दिली. मोबाईल, इंटरनेट आणि एफएम वाहिनी यावर ही यंत्रणा काम करणार आहे. यावरुन सर्वत्र संदेश पोहचविण्यात येईल. तहसिलदार कार्यालयात याचे नियंत्रण असेल.
———————————————–

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *