महापालिकेच्या अग्निशमनदलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री दाखल


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महापूरासह कोणत्याही आपत्तकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमनदलात अत्याधुनिक यंत्रसामुग्री दाखल झाल्या आहेत.
     जिवित हानी होवू नये. तातडीने आपत्तकालीन परिस्थिती हाताळता यावी, यासाठी हि यंत्रसामुग्री महत्वाची भूमिका बजावणार आहे. १५० मिटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाईफलाईन लाँचर, कोसळलेल्या इमारतीमधील व्यक्तिस सुखरुप बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारा लोकेशन कॅमेरा आणि आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजीन कॅमेराचा यामध्ये समावेश आहे.
       गेल्या दोन वर्षापासून पूराचे संकट शहरावर येत आहे. २०१९ मध्ये आलेल्या महापूराचा यामध्ये समावेश आहे. या संकटचा सामना महापालिकेने तत्परतेने केला. भविष्यामध्ये अशी स्थिती पुन्हा निर्माण झाल्यास त्याच्या उपाययोजना करण्यासाठी महापालिकेकडे काही यंत्रसामुग्री असणे आवश्यक होते. त्यानुसार महापालिकेमध्ये दोन दिवसापुर्वीच अद्यावत अशी यंत्रसामुग्री दाखल झाली आहे. यामुळे अग्निशमन विभाग आणखीन भक्कम झाला आहे.  
           पाण्यात आडकलेल्यांसाठी लाँचर…..
     महापालिकेच्या अग्निशमन दलात अद्यावत अशी मशनरी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये लाईफलाईन लाँचरचा समावेश आहे. याच्या मदतीने १०० ते १५० मीटर अंतरावरील पाण्यातील अडकलेल्या व्यक्तिस जवळ दोरी जाईल व लाईफ जॅकेट त्याच्यापर्यंत पोहचेल अशी सुविधा असणारी यंत्रणा आहे.
            व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा…..
      यंत्रसामुग्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेल्या कॅमेराही यंदा दाखल झालेला आहे. धोकादायक इमारत कोसळली असल्यास किंवा अरुंद जागेत, बोअरवेलमध्ये एखादा व्यक्ति अडकून पडल्यास त्याचे बचावकार्य करण्यासाठी महत्वाचा ठरणारा हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा अडकलेल्या व्यक्तिपर्यंत जाऊन त्याची चित्रफित, त्याच्याशी संवाद साधणे शक्य होते. संबंधीत व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडकलेला आहे. याची माहिती त्वरीत मिळत असल्याने जिवित हानी होण्यापासून बचाव करणे यामुळे शक्य होते.
            थर्मल इमॅजिन कॅमेरा…..
     एखाद्या ठिकाणी आगीसारखी घटना घडल्यास धुरामध्ये अथवा आगीच्या लोटात संबंधीत व्यक्ती कोणत्या ठिकाणी अडचणीत सापडली आहे याचा शोध घेणे किंवा तेथील तापमान किती आहे. याची माहिती मिळण्यासाठी महत्वाची असणारे  थर्मल इमॅजिन कॅमेराही महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या ताफयात दाखल झाला आहे. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने धुरामध्ये अडकलेल्या किंवा आगीमध्ये अडकलेल्या व्यक्तिचा शोध घेवून त्याला वाचवले जावू शकते.
      २०१९ च्या महापूरामध्ये महापालिकेच्या अग्निशमन विभागाने उपलब्ध साधनसामुग्रीच्या आधारे चोख कामगिरी बजावली. पूरामध्ये अडकलेल्यांचे प्राण वाचवले. भविष्यामध्ये अशा प्रकारे कोणती आपत्ती आल्यास त्याचा सामना करण्यासाठी अत्याधुनिक साधने असणे आवश्यक आहे. याचा विचार करुन महापालिक प्रशासनाने जिल्हा नियोजन मंडळाकडे अधुनिक साधने खरेदीसाठी निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने तात्काळ यासाठी निधी उपलब्ध केला. त्यातून लाईफ लाईन लाँचर, लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमॅजीन कॅमेरा महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले असल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले यांनी दिली आहे.
———————————————– Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *