वनस्पतींच्या नावाने परिचित असलेल्या वृक्षांची रोपे दिली दत्तक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्रातील अनेक गावे वनस्पतींच्या नावाने परिचित आहेत. आंतरराष्ट्रीय फळे व पालेभाज्या संवर्धन वर्षानिमित्त निसर्गमित्र संस्थेतर्फे कोल्हापूर जिल्ह्यातील वनस्पतींच्या नावाने परिचित असलेल्या गावांना भेटी देण्यात आल्या. या भेटीत विविध वनस्पतींच्या मूळ वाणाचे संकलन करण्यात आले. याबरोबरच काही गावातील तेथील वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक परिस्थिती व वातावरणामुळे तयार होणाऱ्या फळे, भाज्या व औषधी वनस्पतींच्या वाणांचेही संकलन करण्यात आले आहे. वनस्पतींच्या नावाने परिचित असलेल्या या वृक्षांच्या रोपांची निर्मिती करून ती दत्तक देण्यात आली.
     निसर्गाचा हा समृद्ध वारसा टिकवण्यासाठी या बहुमूल्य वनस्पतींचे जतन व्हावे म्हणून सुमारे ६० वनस्पतींची रोपे संस्थेमार्फत तयार करण्यात आली असून ती दत्तक देण्याचा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमाची सुरुवात आधुनिक शेती व निसर्गशेती करणाऱ्या सौ. व श्री. शेखर भोसले व शेखर सुतार या युवा शेतकऱ्यांच्या हस्ते कुंडीमध्ये म्हाळुंगे व पपनस या वृक्षांचे रोपण करण्यात करण्यात आले. यावेळी श्री. भोसले व श्री. सुतार यांचा सत्कार दिलीप पेटकर यांच्या हस्ते करण्यात आला.
      दरम्यान, ही रोपे प्रभाग क्रमांक ४४, मंगेशकरनगर परिसरातील निसर्गप्रेमी कुटुंबांना जोपासण्यासाठी एक वर्षाकरिता देण्यात आली.
      यामध्ये वड, पिंपळ, म्हाळुंगे, वेखंड, बेल, तिवर, कवट, हळद, शेंद्री, फणस, आंबा, रिठा, टाकळी, कणेरी, अर्जुन, साळवण, ऐण, करंज, हिरडा, चिंच, कांचन, आपटा, मिरवेल, पांगारा इत्यादी रोपे गावांच्या नावाची तसेच स्थानिक भौगोलिक वातावरणामध्ये आढळलेली बंफर (पपनस), हनुमान फळ, खेरशिंगी, रुद्राक्ष, हुंब, वरांदा, पाडळ, पळस, हिंगणमिटा, गोंदणी, कॉफी, मका, चिबूड, मोह, पेरू, बटाटा, रताळे, बिवळा, शमी, वाघाटी, गोमाटी, बांबू, घनसाळ, साळ, करंबळी, बाजीराव घेवडा, वरी, हादगा, त्रिफळा, मिरची, वांगी, राजीगरा, पायर इत्यादी वनस्पतींची रोपे तयार करण्यात आली आहेत.
     याविषयी निसर्गमित्र संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले म्हणाले की, रोपांचे भविष्यात वनस्पती प्रदर्शन व पोस्टर, शहर व गाव परिसरामध्ये भरविण्यात येणार आहे. तसेच सर्वच वनस्पतींची लोकसहभागातून नव्याने रोपे तयार करून गावागावात पोचण्याचा संस्थेचा मानस आहे. या सर्व वनस्पतींचा प्रकल्प सविस्तर माहिती संकलन करून पुस्तक स्वरुपात मांडण्यात येणार आहे.
     या कार्यक्रमास बाबा राजेमहाडिक, अभय कोटणीस, जयराम शिंदे, संजय देशपांडे, डॉ. नारायण गोगटे, प्रफुल्ल खेडकर, कुंदन निमकर, ओंकार मोरे, अमोल सरनाईक आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!