आग्रा ते राजगड “गरूडझेप” मोहिमेतील शिवज्योत सोमवारी करवीरनगरीत

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     छ्त्रपती शिवाजी महाराज यांना औरंगजेबाने आग्रा येथे नजरकैदेत ठेवले होते. मोगलांच्या नजरकैदेतून चाणाक्ष बुध्दीने युक्ती लढवून छत्रपती शिवराय या कैदेतून निसटले व ते सुखरूप स्वराज्यात परतले. यास आजमितीस ३५५ वर्षे झाली. ही घटना म्हणजे हिंदवी स्वराज्याच्या दिशेने छत्रपती शिवरायांनी घेतलेली गरुडझेप होती. या घटनेचे औचित्य साधून आग्रा ते राजगड “गरुडझेप” या मोहिमेअंतर्गत शिवज्योत आणण्याचा उपक्रम घेतला आहे. आग्र्यातून १७ ऑगस्टला निघालेली ही शिवज्योत रविवारी (दि.२९) राजगडावर पोहोचत आहे. तेथून शिवज्योत सोमवारी करवीरनगरीत येणार आहे. कावळा नाका येथील छत्रपती ताराराणी पुतळा येथे शिवज्योतीचे स्वागत करण्यात येणार असल्याची माहिती हिलरायडर्स ॲडव्हेंचर फौंडेशनचे अध्यक्ष प्रमोद पाटील व विजय देवणे यांनी दिली. यावेळी ऋषिकेश केसरकर व एस.आर.पाटील उपस्थित होते.
      ते म्हणाले की, सोमवारी (दि.३०) सायंकाळी चार वाजता छत्रपती ताराराणी पुतळा येथे शिवज्योतीचे स्वागत केल्यानंतर ती छत्रपती राजाराम महाराज पुतळा, छत्रपती शाहू महाराज पुतळा येथून छत्रपती शिवाजी महाराज पुतळा मार्गावर मिरवणूक काढण्यात येईल. मंगळवारी (दि.३१) सकाळी शिवाजी महाराज पुतळा येथून कोल्हापूर जिल्ह्यातील विविध तालुके, गडकोट व ऐतिहासिक ठिकाणांना ज्योती प्रयाण करतील. तसेच जिल्ह्यातील पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, हिरण्यकेशी व ताम्रपर्णी या पाच नद्यांचे पाण्याचे कलश व शिवज्योत ठेवलेल्या शिवरथासह पारगडला रवाना होईल. कागल, निढोरी, मुरुड, गारगोटीमार्गे भुदरगड किल्ला, गडहिंग्लजमार्गे सामानगडावर शिवज्योत जाईल. तेथील मुक्कामानंतर दि.१ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता निघून सामानगड, नेसरीखिंड, गंधर्वगड, चंदगड, कलानिधीगड ते पारगडावर पोहोचलेवर शिवज्योतीचे स्वागत व पूजन होऊन या मोहिमेची सांगता होईल.
                          ———-
                मोहिमेत ३० मावळे सहभागी…..
      छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून नजरकैदेतून सुखरूपपणे स्वराज्यात परतले.  या घटनेला ३५५ वर्षे पूर्ण झाली आहेत. आजही या ऐतिहासिक घटनेमुळे मनात प्रेरणेची, शौर्याची आणि धैर्याची लहर दौडते. छत्रपती शिवरायांच्या झुंजार लढ्याची ही प्रेरणा जीवंत ठेवत महाराष्ट्रातील विविध भागातील ३० मावळे आग्रा ते राजगड “गरूडझेप” मोहिमेंतर्गत शिवज्योत घेऊन येत आहेत. कोल्हापुरातून हिल रायडर्सचे शिलेदार व शंभुराजे मर्दानी विकास मंचचे अध्यक्ष सूरज ढोली सहभागी झाले आहेत. शिवभक्त ॲड. मारुती गोळे (आबा) यांच्या नेतृत्वाखाली पुणे, मावळ, मुळशी, दौंड व कोल्हापूर या भागातून हे मावळे सहभागी झाले आहेत.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!