कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत पॉलिटेक्नीकमध्ये ऑल इंडिया कौन्सिल फॉर टेक्निकल एज्युकेशन (एआयसीटीई) व इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आयएसटीई) पुरस्कृत ” ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी इन कॉम्प्युटर सायन्स” या विषयावर राष्ट्रीय स्तरावरील रिफ्रेशर कार्यशाळेचे आयोजन यशस्वीरीत्या करण्यात आले.
कार्यशाळा आयोजनाचा मान कोल्हापूर जिल्ह्यातून संजय घोडावत पॉलिटेक्नीकला मिळाला. कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी ही कार्यशाळा १९ ते २५ फेब्रुवारी, ५ ते ११ मार्च आणि १२ ते १८ मार्च या तीन आठवड्यामध्ये ऑनलाईन तीन टप्प्यात घेण्यात आली. या कार्यशाळेस देशभरातील ३०० शिक्षकांनी आपला सहभाग नोंदविला होता.
या कार्यशाळेचे उदघाटन एआयसीटीई चे संचालक कर्नल बी. व्यंकट व आयएसटीईचे अध्यक्ष डॉ. पी. के देसाई यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत बोलताना प्राचार्य विराट गिरी म्हणाले की, एआयसीटीई व आयएसटीई या तंत्रशिक्षण क्षेत्रातील नामवंत संस्था असून या कार्यशाळेच्या आयोजनाचा मान आम्हाला मिळाल्याबद्दल या संस्थांचे आभार व्यक्त करतो. या कार्यशाळेमुळे देशभरातील शिक्षकांना मोठ्याप्रमाणात फायदा होणार आहे. कॉम्प्युटर जगतातील अद्यावत ज्ञान आत्मसात करणे आणि शिक्षकांच्या संघटनात्मक शैक्षणिक कौशल्यांमध्ये संवाद साधणे आणि परस्पर विनिमय करण्याची संधी मिळवणे हे या कार्यशाळेचे मुख्य उद्दिष्ट होते.
कार्यशाळा आयोजनासाठी या कार्यशाळेचे समन्वयक व कॉम्प्युटर सायन्स विभागाचे प्रमुख प्रा. सागर चव्हाण व टीमने अथक परिश्रम घेतले.
या आयोजनाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व प्राचार्य विराट गिरी यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
——————————————–