गोडसाखर कारखाना चालवण्यासाठी केलेल्या सहकार्याबद्दल सर्व घटकांचे आभार!

Spread the love


 कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोडसाखर हा ४६ वर्षापूर्वी उभारलेला जिल्ह्यातील जुना साखर कारखाना २०१०-२०११ साली आर्थिक अडचणीमध्ये आला. हंगाम सुरू होणार की नाही, अशा संभ्रमातच कामगारांचे १८ महिन्यांचे पगार थकलेले, एफआरपी व तोडणी वाहतुकीची बिलेही प्रलंबित. या पार्श्वभूमीवर तत्कालीन संचालक मंडळाने हा कारखाना चालवण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती केली होती. तसेच कडगाव – कौलगे या गडहिंग्लज तालुक्याच्या जिल्हा परिषद विभागाचा आमदार म्हणून नुकतीच माझी निवड झाली होती. ऊस उत्पादक, कामगार, तोडणी-वाहतूकदार या सर्व घटकांच्या कल्याणासाठी माझ्या मित्रमंडळींच्या ब्रिस्क फॅसिलीटीज या कंपनीस मी सदर कारखाना शासनाच्या सहभाग योजनेखाली चालवण्यास तयार केले. सन २०१३- १४ ते २०२०-२१ या आठ वर्षात त्यांनी कारखाना यशस्वीपणे चालवला. ४३.३० कोटी ही दहा वर्षाची  पूर्ण रक्कम आगाऊ कारखान्यास अदा करून कारखाना कर्जमुक्त केला. काही देणी शासनाने मान्य केलेली नव्हती.
      या आठही हंगामामध्ये कामगारांचा पगार, बोनस, ऊस उत्पादकांची एफआरपी, तोडणी वाहतूक या सर्व घटकांना समाधानी ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु या आठ वर्षांमध्ये काही कटू प्रसंग आले, विशेषत: कामगारांच्या प्रश्नामुळे. त्याचा फार मोठा परिणाम ब्रिस्क कंपनीच्या व्यवसायावर झाला की, त्यांचे न भरून येणारे नुकसान झाले. कार्पोरेट कंपन्या, मल्टिनॅशनल कंपन्या या कामगारांच्या प्रश्नावर संवेदनशील असतात. या कंपन्यांनी हे प्रकरण गंभीरपणे घेतले. उर्वरित राहिलेली दोन वर्षे पूर्ण करावीत, असा माझा आग्रह होता. परंतु शासनाने ठरवलेली शंभर टक्के रक्कम प्रथमच अदा केल्याने काही गोष्टीत कंपनीचा नाइलाज झाल्यामुळे अधिकची रक्कम व सुविधा करणे कंपनीला भाग पडले. त्यामुळेच आर्थिक भुर्दंड झाला. 
      त्याशिवाय, साखर कारखानदारी मुळातच फार मोठ्या तोट्यात असल्यामुळे कंपनीची दोन वर्षे शिल्लक असतानाही नुकसान सोसून जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. सहकार खात्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवानी  दिलेल्या निर्णयाप्रमाणे, संचालक मंडळाने कारखान्याचा ताबा घेतलेला आहे. त्यांना त्या विभागाचा लोकप्रतिनिधी म्हणून जे लागेल ते सहकार्य करण्याची माझी तयारी आहे. ते माझे कर्तव्य आहे.
       कंपनीची उर्वरित एफआरपी, तोडणी-वाहतूकदारांची देयके, कामगारांची कायदेशीर देणी इत्यादी गोष्टींत ज्याप्रमाणे आठ वर्षे प्रामाणिकपणे व्यवहार केला, त्याप्रमाणेच कंपनी या बाबतीतही प्रामाणिकपणानेच व्यवहार करेल, यावर माझा विश्वास आहे. तसेच सहकार विभागाच्या निर्णयाप्रमाणे कंपनीची योग्य देणी कारखाना संचालक मंडळ कंपनीस अदा करेल, यावरही माझा विश्वास आहे.
      गेली आठ वर्षे कारखाना चालवण्यासाठी ब्रिस्क फॅसिलिटीज कंपनीस केलेल्या सहकार्याबद्दल सर्व घटकांचे मनःपूर्वक आभार!

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!