ठेवीसाठी दिवाळी पाडव्यादिवशी केडीसीसीच्या सर्व शाखा राहणार सुरू

• जादा व्याजदराच्या सप्तरंग व अमृतधारा ठेवयोजना सुरू
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (केडीसीसी) सर्व म्हणजे १९१ शाखा  शुक्रवार दि.५ रोजी दिवाळी पाडव्यादिवशी सुरू राहणार आहेत. दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर ठेवी स्वीकारण्यासाठी सकाळी साडेदहा ते दुपारी एक वाजेपर्यंत  बँकेचे कामकाज सुरू राहणार असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ए. बी. माने यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
      बँकेने खास दीपावली सणानिमित्त ज्यादा व्याजदराच्या सप्तरंग व अमृतधारा या दोन नवीन ठेव योजना सुरू केल्या आहेत. सप्तरंग या पुनर्गुंतवणूक ठेव योजनेची अठरा महिने मुदत व सात टक्के व्याज आहे. तसेच अमृतधारा योजनेअंतर्गत मुदतबंदसाठी ७.१० टक्के व्याजदर आहे.
      केडीसीसी बँकेने अलीकडेच साडेसात हजार कोटी ठेवींचा टप्पा यशस्वीरित्या पार केलेला आहे. चालू आर्थिक वर्षाअखेर बँकेचे नऊ हजार कोटी ठेवींचे उद्दिष्ट आहे. तसेच बँकेचा संयुक्त व्यवसायाचा आलेखही १५ हजार कोटीकडे वाटचाल करीत आहे. बँकेच्या ठेवीदारांनी दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या नजीकच्या शाखेमध्ये जाऊन ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही डॉ. श्री. माने यांनी केले आहे.
      ३१ मार्च २०२१ या आर्थिक वर्षाअखेर बँकेच्या सर्व म्हणजे १९१ शाखा नफ्यात आहेत. तसेच; बँकेचा ऑडिट वर्ग सतत “अ” आहे.
      या पत्रकात पुढे म्हटले आहे, शेतकऱ्यांना पाच लाखांपर्यंत पिककर्ज शून्य टक्के व्याजदराने म्हणजेच बिनव्याजी देण्याचा महत्त्वाचा निर्णय नुकताच बँकेने घेतलेला आहे. गेली दोन वर्ष सुरू असलेल्या कोविड  संसर्गाच्या महामारीतसुद्धा बँकेने शेतकऱ्याला विनाविलंब पिककर्ज पुरवठा व मध्यम मुदत कर्ज पुरवठा करून शेतीच्या कामामध्ये कोणताही अडथळा येणार नाही, याची खबरदारी घेतली आहे. त्यामुळेच सरकारने दिलेल्या पीक कर्जाच्या उद्दिष्टाच्या तब्बल २०८ टक्के पीक कर्ज वाटप करीत या बँकेने शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा दिला आहे. शेतकऱ्यांच्या इतर अनुषंगिक गरजांसाठी मध्यम मुदतीचा कर्जपुरवठाही केला आहे. तसेच; बँकेने बचत गटांनाही प्रसंगी नियमात शिथिलता आणून अर्थपुरवठा केला आहे. कोविड संसर्गाच्या काळात ग्राहकाला घरातूनच व्यवहार करता यावेत यासाठी केडीसी बँकेने ‘केडीसीसी मोबाईल बँकिंग’ व ‘केडीसीसी बँक ऑन व्हील्स’ ही गावोगावी अद्ययावत सुविधा सुरू केली. बँकेच्या शाखा नसलेल्या गावातून उभारलेल्या मायक्रो एटीएम सेंटर्सनाही ग्राहकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्यातील सर्वच दूध वितरकांचा दूध बिल भरणा सुट्टी न घेता स्वीकारला जातो, हेही या बँकेचे वैशिष्ट्य आहे.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *