१ जूनपासून सर्व प्रकारचा व्यापार सुरू झालाच पाहीजे: ललित गांधी

• दोन महिन्यांच्या प्रदीर्घ बंदमुळे सामान्य व्यापारी अडचणीत
कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाराष्ट्रातील कोरोना संबंधित घोषित निर्बंध १ जून रोजी संपुष्टात येत असून या दिवसापासून सर्वच व्यापार पुर्णवेळ सुरू करण्यासाठी परवानगी मिळालीच पाहीजे, अशी आग्रही मागणी ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे राष्ट्रीय संगठन मंत्री व महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे वरिष्ठ उपाध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे.
     महाराष्ट्राच्या शेजारील विविध राज्यांत सर्व प्रकारचे व्यापार सुरू असल्याने यापुढे बंद राहिल्यास महाराष्ट्रातील व्यापार शेजारील राज्यात जाण्याची भिती आहे व हे नुकसान कधीही भरून निघणार नाही, त्यामुळे आता १ जूननंतर कोणत्याही परिस्थितीत व्यापार सुरू करायचाच अशी व्यापार्‍यांची आग्रही भूमिका असल्याने सरकारने आता दुकाने सुरू करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
     राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनाद्वारे ही मागणी करण्यात आली असून दोन महिन्यांच्या बंद कालावधीतील महापालिका, नगरपालिकांच्या अधिकार क्षेत्रातील दुकानांचे भाडे माफ करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या परवाना फीमध्ये एक वर्षाची माफी द्यावी, प्रॉपर्टी टॅक्स, वीज बिल व कर्जावरील व्याज माफी यांचा समावेश असलेले विशेष पॅकेज व्यापार्‍यांसाठी जाहीर करावे, अशी मागणी केल्याची माहिती ललित गांधी यांनी दिली.
      राज्यातील कोरोना संक्रमणाचे प्रमाण नियंत्रणात आले असून १ जूननंतर रेडझोनमधील जिल्ह्यांसह सर्वच जिल्ह्यातील व्यापार सुरू झाला पाहीजे अशी विशेष मागणी करून व्यापारी व त्यांच्या कर्मचार्‍यांसाठी लसीकरणासाठी विशेष व्यवस्था करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
      राज्यातील बहुतांश दुकानदारांनी लसीकरण करून घेतले असून उर्वरीत व्यापार्‍यांनीही लवकरात लवकर स्वतःचे व कर्मचार्‍यांचे लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स  व महाराष्ट्र चेंबरतर्फे करण्यात आले आहे.
      मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनाच्या प्रती उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मुख्य सचिव सिताराम कुंटे, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनाही पाठवण्यात आल्या असून सरकाने त्वरीत निर्णय जाहीर करण्याची मागणी केली आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *