‘ओमकाररूपिणी ‘ स्वरूपात श्री अंबाबाईची पूजा
कोल्हापूर • प्रतिनिधी
अश्र्विन शुद्ध चतुर्थीला अर्थात नवरात्रातील चौथ्या माळेला करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची ‘ ओमकाररूपिणी ‘ स्वरूपात सालंकृत पूजा बांधण्यात आली. ही पूजा मकरंद मुनिश्वर आणि माधव मुनिश्वर यांनी बांधली.
यंदाच्या नवरात्रौत्सवात करवीरनिवासिनीचे करवीर महात्म्यातील निवडक स्तोत्रांमधून होणारे दर्शन ही पूजेसाठी संकल्पना राबवली आहे. साडेतीन शक्तिपीठांपैकी एक पीठ असलेल्या करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीची नवरात्रातील चौथ्या माळेला म्हणजेच चतुर्थीला बांधलेल्या पूजेचा संदर्भ असा, चतुर्थीला करवीरनिवासिनी आपल्या व्यापक स्वरूपात विराजमान आहे. चतुर्थीला करवीरनिवासिनीचे सहस्रनामस्तोत्र भक्तांसाठी उध्दृत होणार आहे.या सहस्त्रनामांची पार्श्र्वभूमी अशी, मार्कंडेय ऋषी आणि नारदमुनी यांच्या संवादातून सनत्कुमारांनी सांगितलेल्या महालक्ष्मी सहस्रनामाचे विवेचन केले आहे. सनत्कुमार योगिजनांना महालक्ष्मीची हजार नावे सांगतात.