अंबाबाई मंदीर,हुतात्मा पार्क परिसर झाला चकाचक

अंबाबाई मंदीर परिसर झाला चकाचक
कोल्हापूर • प्रतिनिधी :
आगामी नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर रविवारच्या स्वच्छता मोहिमेत करवीर निवासिनी श्री अंबाबाई – श्री महालक्ष्मी मंदीर, हुतात्मा पार्क व पंपहाऊस परिसर महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वच्छ करुन चकाचक बनविला. या स्वच्छता मोहिमेत तीन टन कचरा व प्लॅस्टिक गोळा करण्यात आले. नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलेशेट्टी यांनी हातात झाडू घेऊन स्वच्छता मोहिमेस प्रारंभ केला.
स्वच्छता मोहिमेचे वैशिष्टय म्हणजे श्री अंबाबाई मंदीर परिसर स्वच्छ करण्याबरोबरच शहरातील प्रमुख रस्त्यांचीही स्वच्छता करण्यात आली, श्री अंबाबाई मंदीर परिसरात नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वत: स्वच्छता करुन कोल्हापूर शहर स्वच्छ, सुंदर आणि आरोग्यदायी ठेवण्याचा संकल्प दिला.  तसेच पंपहाऊस जयंती नाला येथे नूतन महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे आणि मावळते आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहिम हाती घेण्यात आली.
यावेळी महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. तसेच या मोहिमेत सक्रीय योगदान देणाऱ्यांचा रोप देऊन सत्कार करण्यात आला. यापुढेही स्वच्छतेची चळवळ अधिक गतीने राबवून कोल्हापूर शहर स्वच्छ सुंदर व आरोग्य दायी बनवण्याचा संकल्प व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *