अंबाबाई मंदिरासह सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली


सकाळी ९ ते १२ व दुपारी ४ ते ७ या वेळेत उद्यापासून भाविकांना दर्शन

कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोरोनाच्या पार्श्र्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात बंद असलेली  मंदिरे खुली करण्याबाबत महाराष्ट्र शासनाने जाहिर केले असल्याने सोमवार (दि.१६)पासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी मंदिरासह सर्व मंदिरे भाविकांना दर्शनासाठी खुली होणार आहेत. यानिमित्ताने देवस्थान समितीने नियमावली तयार केली असल्याची माहिती पश्र्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी सदस्य शिवाजी जाधव, राजेंद्र जाधव यांच्यासह सचिव विजय पवार आदी उपस्थित होते.
      दरम्यान, देवस्थान समितीच्या व्यवस्थापनेखाली असलेल्या ३०६७ मंदिरात भाविकांना दर्शनाची सोय होणार आहे. श्री करवीरनिवासिनी अंबाबाई – महालक्ष्मी, श्री केदारलिंग – जोतिबासह देवस्थानकडे असलेली मंदिरे भाविकांना सकाळी ९ ते१२ व  दुपारी ४ ते ७ या वेळेत अटी व निर्देशाचे पालन करून दर्शनासाठी खुली राहणार आहेत.
       श्री अंबाबाई मंदिरात दिवसभरात तीन हजार भाविकांना दर्शन मिळणार असल्याचे सांगून महेश जाधव म्हणाले की, पूर्व दरवाजातून भाविकांना प्रवेश तर दक्षिण दरवाजातून भाविकांना बाहेर जाण्याचा मार्ग राहणार आहे. भाविकांना कासव चौकातून देवीचे दर्शन घ्यावे लागणार आहे. शासनाच्या निर्देशानुसार १० वर्षांपेक्षा कमी आणि ६५ वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या लोकांनी दर्शनास मंदिरामध्ये येऊ नये.
भाविकांना मंदिर परिसरात फिरता येणार नाही.
      मंदिरात प्रवेश करताना भाविकांनी थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर करूनच प्रवेश करावा.मास्क नसेल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही.मंदिर आवारात कोणत्याही भक्ताने मास्क काढला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *