कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापुरचा युवा फुटबॉल खेळाडू अनिकेत अनिल जाधव याची २३ वर्षाखालील भारतीय फुटबॉल संघात निवड झाली आहे. हा संघ एएफसी एशियन कप युझबेकिस्तान २०२२ क्वॉलिफायरसाठी बेंगलोर येथे सराव करणार आहे. २८ खेळाडूंची सराव शिबिरासाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये अनिकेत जाधव याचा समावेश आहे.
भारतीय संघाचा ई गटात समावेश असून या गटात भारताला ओमान, किर्गीज रिपब्लिक आणि यजमान संयुक्त अरब अमिरात (युएई) या संघांबरोबर खेळावे लागणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना २५ ऑक्टोबरला ओमान, दुसरा सामना २८ ऑक्टोबरला युएई आणि तिसरा सामना ३१ ऑक्टोबरला किर्गिज रिपब्लिकबरोबर आहे.
अनिकेतने यापूर्वी २०१७ मध्ये भारतात झालेल्या फिफा १७ वर्षाखालील युवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघातून प्रतिनिधित्व केले आहे.
…………….
सर्वांना अभिमान वाटेल अशी कामगिरी करू: अनिकेत जाधव
२०१९ नंतर मला आता पुन्हा भारताची जर्सी घालायला मिळणार याचा मला खूप आनंद होत आहे. या निवडीसाठी मी दोन वर्षे खूप मेहनत घेतली. मी अजून चांगला खेळ करून सर्व भारतीयांना आणि कोल्हापूरकरांना अभिमान वाटेल अशी कामगिरी नक्कीच करेन. माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या आणि या कठीण प्रवासात मला पाठिंबा देणाऱ्या प्रत्येकाचे मनापासून आभार.
माझ्या संपूर्ण प्रवासात श्रीमंत मालोजीराजे छत्रपती, सौ. मधुरिमाराजे छत्रपती, आमदार ऋतुराज पाटील तसेच माझे कोच जयदीप अंगिरवाल यांचे नेहमीच सहकार्य राहिले, त्यांचेही मनापासून आभार.