कोल्हापूर • प्रतिनिधी
शाकंभरी पौर्णिमेदिवशी मोफत भोजन प्रसाद सेवा सुरु केलेल्या श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा १३ वा वर्धापनदिन सोहळा गुरुवारी उत्साहात साजरा झाला.
थोडक्यात अन्नछत्रविषयी ……
करवीरनिवासिनी श्री अंबाबाई – महालक्ष्मी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. परगावाहून येणाऱ्या भाविकांना मोफत भोजन प्रसाद उपलब्ध व्हावा म्हणून २००८ साली शाकंभरी पौर्णिमेदिवशी श्री महालक्ष्मी धर्मशाळेच्या हॉलमध्ये पहिला प्रसाद केला. सामाजिक सेवेची परंपरा असलेल्या राजू मेवेकरी यांनी आपल्या सहकाऱ्यांना एकत्रित करून श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टचा पाया रचला. त्यावेळी प्रत्येक पौर्णिमेला हा प्रसाद चालू ठेवण्यात आला. त्यानंतर प्रत्येक शुक्रवारी सुरू झाला. बाहेर गावाहून देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची गर्दी वाढू लागल्यावर प्रत्येक पौर्णिमा, शुक्रवार, शनिवार व रविवार असा भोजन प्रसाद चालू झाला. २००८ साली सुरू झालेला हा उपक्रम श्री अंबाबाईच्या कृपाशिर्वादाने व भक्तांच्या सहकार्याने व्यापक आकार घेऊ लागला. सन २०१३ पासून मात्र श्री महालक्ष्मी अन्नछत्र हे दररोज चालू झाले. आता दररोज हजारो भाविक या अन्नछत्राचा लाभ घेतात.
श्री महालक्ष्मी अन्नछत्र सेवा ट्रस्टने ” भक्ती परमेश्र्वराची, सेवा मानवाची ” हे ब्रीदवाक्य घेऊन, आलेल्या भाविकांना मोफत अन्नदान उपक्रम भाविकांच्या दानशूरतेच्या जोरावर सुरू ठेवला आहे. दिवाळी सणासाठी अनाथ मुलांना नवीन कपडे तसेच गरीब व गरजू ५०० कुटुंबांना प्रत्येकी पाच किलो दिवाळी फराळ देऊन गोरगरिबांना दिवाळी सण साजरा करण्यासाठी हातभार लावला जातो. सीपीआर रुग्णालयाच्या प्रसुती विभागात गरजूंना दररोज जेवणाचे डबे देऊन मदत केली जाते. तसेच रक्तदान उपक्रमही राबविण्यात येतो. अशाप्रकारे संस्था आता अन्नदानाशिवाय अनेक विधायक उपक्रम राबवित आहे. अशा या सेवाभावी श्री महालक्ष्मी अन्नछत्रचा वर्धापनदिन सोहळा शाकंभरी पौर्णिमेदिवशी साजरा होतो.