कोल्हापूर • प्रतिनिधी
जिद्द, मेहनत व चिकाटी असेल तर कोणतेही यश सहज मिळवू शकतो याचेच उदाहरण म्हणजे शिवाजी विद्यापीठाच्या पदार्थविज्ञान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.आण्णासाहेब मोहोळकर. अल्पेर-डोजर (एडी) सायंटिफिक इंडेक्स ने २०२२ मध्ये प्रसिद्ध केलेल्या टॉप जागतिक शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये डॉ.मोहोळकर यांना स्थान मिळाले आहे. आपल्या संशोधन अभिवृत्तीस चालना देऊन त्यांनी संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांच्या या यशामुळे शिवाजी विद्यापीठाला आंतरराष्ट्रीय स्तरावर बहुमान प्राप्त झाला आहे.
संशोधन क्षेत्रात केलेल्या अतुलनीय कामगिरीबद्दल डॉ.मोहोळकर यांना आजवर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठाने घेतलेल्या सर्वेक्षणात जागतिक क्रमवारीत टॉप २ % शास्त्रज्ञांच्या यादीमध्ये स्थान मिळाले होते.
डॉ. मोहोळकर यांनी मटेरियल सायन्स क्षेत्रात केलेल्या संशोधनाची दखल जागतिक स्तरावर घेण्यात आली आहे. सध्या ते गॅस सेन्सिंग, सुपरकपॅसिटर, वॉटर स्प्लिटिंग, हैड्रोजन एनर्जी इ.विषयावर पुढील संशोधन करीत आहेत.
विद्यार्थ्यांच्या अंगी संशोधन अभिवृत्ती निर्माण व्हावी व समाजातील प्रश्न घेऊन विज्ञान व संशोधनाच्या माध्यमातून ते सोडविण्यासाठी ते नेहमीच पुढाकार घेतात. डॉ. मोहोळकर हे नेहमीच मूलभूत व समाजपयोगी संशोधनाला प्राधान्य देतात. आपल्या मार्गदर्शनाने त्यांनी कित्येक गरीब होतकरू विद्यार्थ्यांना पोस्ट डॉक्टरेटसाठी परदेशी पाठवून विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या गुणवत्तेला चालना दिली आहे. ग्रामीण भागामध्ये विज्ञानाचा प्रसार करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात.
डॉ. मोहोळकर यांनी संशोधनामध्ये विविध विषयावर पेटंट मिळविले आहेत. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून पीएच डी पदवी घेतल्यानंतर दक्षिण कोरिया येथून पोस्ट डॉक्टरेट पदवी मिळविली. २००९ साली बॉईजकास्ट फेलो म्हणून भारतातून ७२ तर महाराष्ट्रातून २ जणांची निवड करण्यात आली होती त्यापैकी ते एक आहेत. त्यांनी आजवर १८० हुन अधिक शोधनिबंध आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध केले आहेत व तसेच त्याचा संदर्भ आधार जगभरातून ७२९९ हुन अधिक संशोधकांनी आपल्या शोधनिबंधांमध्ये घेतला आहे. सध्या ते जगभरातील टॉप जर्नल्सचे संपादक व रिव्युव्हर म्हणून काम पाहतात. त्यांनी जवळपास ८ हुन अधिक मेजर प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत व यासाठी जवळपास दीड कोठीहुन अधिक निधी त्यांना प्राप्त झाला आहे. यामाध्यमातून त्यांनी संशोधन करणाऱ्या विद्यार्थ्यांना फेलोशिप देऊन शिकविले आहे. एकंदरीतच त्यांनी शैक्षणिक, सामाजिक व संशोधन क्षेत्रात केलेली कामगिरी उल्लेखनीय आहे.
——————————————————-