कृषिपंप ग्राहकांनी थकबाकी मुक्तीसाठी कृषी धोरणाचा लाभ घेण्याचे आवाहन

Spread the love

• मुख्य अभियंता परेश भागवत यांचे आवाहन
कोल्हापूर • प्रतिनिधी
      राज्य शासनाने शेतकऱ्यांना वीजबिलाच्या थकबाकीतून मुक्त करण्यासाठी कृषी धोरण २०२० हे महत्वकांक्षी धोरण जाहीर केले आहे. सद्यस्थितीत महावितरणकडून कृषी धोरणाची अंमलबजावणी करण्यात येते आहे. या धोरणांतर्गत कृषिपंप ग्राहकांनी ३१ मार्च २०२२ पर्यंतच्या मुदतीत ५० टक्के थकीत वीज बिल भरल्यास ५० टक्के वीज बिल माफ होणार आहे. तरी कृषी धोरणाचा लाभ घेऊन कृषिपंप ग्राहकांनी थकबाकीमुक्त व्हावे, असे आवाहन महावितरणचे मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले आहे.                     
      कृषी धोरणानुसार चालू व कायमस्वरुपी वीजपुरवठा खंडित सर्व उच्चदाब, लघुदाब कृषिपंप ग्राहक आणि उपसा जलसिंचन योजना सुधारीत मुळ थकबाकीची ५० टक्के रक्कम भरून उर्वरीत ५० टक्केच्या माफी योजनेचा लाभ घेऊ शकतात. एक ते तीन वर्षासाठी टप्प्याने योजनेत सहभाग घेतल्यास त्या त्या वर्षी भरलेल्या मूळ थकबाकीच्या रक्कमेपैकी पहिल्या वर्षी ५० टक्के, दुसऱ्या ३० टक्के तर तिसऱ्या वर्षात २० टक्के रक्कम माफ करण्यात येईल. कृषिपंप ग्राहकांनी चालू वीजबिले भरणे आवश्यक आहे.
       कृषी धोरणानुसार निर्लेखन, व्याज व विलंब आकार माफीनंतर सप्टेंबर २०२० अखेर कोल्हापूर,सांगली जिल्ह्यात ३ लक्ष ८४ हजार ५१९ कृषिपंप ग्राहकांकडे १ हजार ४८२ कोटीं ६२ लक्ष रूपयांची सुधारीत थकबाकी आहे.कोल्हापूर जिल्ह्यात १ लक्ष ४५ हजार ४५३ ग्राहकांकडे ४२९ कोटी ४२ लक्ष रूपये तर सांगलीत २ लक्ष ३९ हजार ६६ ग्राहकांकडे १०५३ कोटी २० लक्ष रूपये थकबाकी आहे. निर्लेखनाव्दारे दोन्ही जिल्ह्यात मिळून १०७ कोटी ९८ लक्ष रुपये तर विलंब आकार व व्याजाचे १६८ कोटी ६९ लक्ष रुपये माफ करण्यात आले आहेत. अद्यापपर्यंत कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील १ लक्ष ४२ हजार ९८ कृषिपंप ग्राहकांनी २३४ कोटी २३ लक्ष रुपये चालू व थकीत वीज बिल भरून कृषी धोरणाचा लाभ घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील ८१ हजार ३०६ कृषिपंप ग्राहकांनी ११७ कोटी ६७ लक्ष व सांगली जिल्ह्यातील ६० हजार ७९२ कृषिपंप ग्राहकांनी ११६ कोटी ५६ लक्ष रुपये चालू व थकीत वीज बिल भरले आहे.
      कृषी ग्राहकांकडून भरणा झालेल्या रक्कमेच्या प्रत्येकी ३३ टक्के प्रमाणे ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर कृषी आकस्मिक निधीत जमा करण्यात येणार आहेत. कृषी धोरणानुसार सदर निधीतून ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण, विस्तारीकरणाची कामे करण्यात येणार आहेत. कृषी ग्राहकांना वीज बिलांची थकबाकी, माफी व भरावयाची रक्कम आदींचा तपशील महावितरणने पुढील वेबपोर्टलवर https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/ उपलब्ध करून दिला आहे. अधिक माहितीसाठी नजिकच्या महावितरण कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!