• ई पीक पाहणी ॲपव्दारे पिकांची नोंदणी करण्याचे आवाहन

Spread the love

आता शेतकरीच करणार स्वतःच्या पिकांची ७/१२ ला नोंदणी


कोल्हापूर • (जिमाका)
     राज्य शासनाच्या ई पीक पाहणी या महत्वाकांक्षी प्रकल्पामध्ये सर्व शेतकऱ्यांनी मोबाईल ॲपव्दारे पिकांची प्रत्यक्ष नोंदणी व पिकांची माहिती फोटोसह अपलोड करावी. माहिती अपलोड करण्यास काही अडचण आल्यास तलाठी किंवा कृषी सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहूल रेखावर यांनी केले आहे.
      दि. १५ ऑगस्ट २०२१ पासून ई पीक पाहणी प्रकल्प राज्यभर राबविण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत शासनाव्दारे ई पीक पाहणी हे मोबाईल ॲप विकसित केले आहे. या ॲपव्दारे शेतकऱ्यांनी स्वतः आपल्या पिक पेरणीची माहिती भरण्यासाठी तालुकानिहाय प्रत्येक गावामध्ये तलाठी व कृषी सहाय्यक हे प्रशिक्षक म्हणून नेमले आहेत. हे प्रशिक्षक सर्व शेतकऱ्यांना ई पीक पाहणी या मोबाईल ॲपचा वापर कसा करावा याविषयी प्रशिक्षण देत आहेत. प्रत्येक गावात तंत्रस्नेही तरुणांचा गटसुध्दा सर्वाना मदत करण्यासाठी बनविण्यात आला आहे.
      पूर्वी तलाठी गावामध्ये दवंडी देवून व प्रत्यक्ष शेतावर जाऊन पीक पाहणी करून पिकांच्या नोंदी घेत असत. यानंतर संगणीकृत ७/१२ वर पिक पेऱ्याची नोंदी करण्यात येवू लागल्या. आता बदलते स्वरूप म्हणून शेतकऱ्यांना स्वतःच स्वतःच्या पिकांच्या नोंदी करण्यासाठी पारदर्शक सुविधा उपलब्ध झाली आहे. यापुढे याच पध्दतीने नोंदी करावयाच्या आहेत. तसेच तलाठी स्वतः पीक पेरा नोंदवू शकणार नाहीत. गाव नमूना १२ अद्यावत करण्याची ही एकमेव सुविधा उपलब्ध राहणार आहे.
      सर्व शेतकऱ्यांनी १५ सप्टेंबर २०२१पूर्वी आपल्या शेतातील पिकांच्या नोंदी पूर्ण कराव्यात. या नोंदी शेतकऱ्यांनी न केल्यास पीककर्ज, पीकविमा व सर्व कृषीविषयक व शासकीय योजनांच्या लाभापासून (उदा. ठिबक व तुषार सिंचन इत्यादी पासून) वंचित रहावे लागेल.
——————————————————- 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!