केएमटी उपक्रमाच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापकपदी मंगेश गुरव यांची नियुक्ती

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर महानगरपालिका परिवहन (के.एम.टी.) उपक्रमाच्या अतिरिक्त परिवहन व्यवस्थापक या पदाचा अतिरिक्त कार्यभार प्रादेशिक परिवहन कार्यालय, कोल्हापूरकडील मोटार वाहन निरिक्षक मंगेश अशोक गुरव यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. 
     अति.परिवहन व्यवस्थापक या पदावर प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडील अधिकारी उपलब्ध होणेबाबत महानगरपालिका प्रशासनाकडून परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांच्याकडे मागणी करण्यात आली होती. त्यानुसार परिवहन आयुक्त कार्यालय, मुंबई यांचेकडून मंगेश गुरव यांच्याकडे केएमटीच्या अति.परिवहन व्यवस्थापक पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविणेबाबतचा आदेश नुकताच पारित करण्यात आला. 
     मंगेश गुरव हे सन २०१४ पासून महाराष्ट्र परिवहन सेवेमध्ये असून, मोटार वाहन निरिक्षक या पदावर कार्यरत आहेत. यापुर्वी त्यांनी औरंगाबाद, कोल्हापूर याठिकाणी सेवा बजावली आहे. गुरुवारी (दि.२७) सकाळी मंगेश गुरव यांनी महानगरपालिका मुख्य कार्यालय येथे अति.आयुक्त नितीन देसाई आणि उप आयुक्त रविकांत आडसूळ यांची भेट घेऊन अति.परिवहन व्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारला. 
      कार्यभार स्वीकारल्यानंतर श्री.गुरव यांनी के.एम.टी. प्रधान कार्यालय, शास्त्रीनगर येथील मुख्य यंत्रशाळा येथे भेट देऊन कामकाजाची माहिती घेतली. परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नवाढीसाठी तसेच प्रवासी नागरिकांच्या सोईसाठी अधिकाधिक बसेस मार्गस्थ ठेवण्यासाठी प्रयत्नशील रहाणार असल्याचा मनोदय त्यांनी यावेळी व्यक्त केला.  

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!