पश्चिम महाराष्ट्रात वीजबिलांची थकबाकी २३५९ कोटींवर

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
      वारंवार आवाहन करूनही वीजबिलांच्या थकबाकीचा भरणा होत नसल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील ४७ लाख ३० हजार ९०० वीजग्राहकांकडे तब्बल २३५९ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी झाली आहे.
      विशेष म्हणजे या सर्व ग्राहकांचा वीजपुरवठा अद्यापही सुरु ठेवण्यात आला आहे. परंतु थकबाकीमुळे महावितरणवरील आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. दिवसेंदिवस वाढत असलेले हे आर्थिक संकट दूर करण्यासाठी चालू वीजबिलांसह थकबाकीचा भरणा करावा असे  आवाहन पुणे प्रादेशिक संचालक (प्र.) अंकुश नाळे यांनी केले आहे.
      गेल्या ऑक्टोबर ते डिसेंबरपर्यंत तीन महिन्यात पश्चिम महाराष्ट्रातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीतील थकबाकीदारांच्या संख्येत तब्बल १४ लाख ९० हजार ३०० ग्राहकांची भर पडली असून थकबाकी देखील ६९३ कोटी २ लाखांनी वाढली आहे. सद्यस्थितीत पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यामध्ये ४७ लाख ३० हजार ९०० वीजग्राहकांकडे २३५९ कोटी १३ लाख रुपयांची थकबाकी आहे.
     कोल्हापूर जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक व सार्वजनिक सेवा वर्गवारीमध्ये गेल्या तीन महिन्यांत १ लाख ५ हजार ३५० थकबाकीदारांची व १०९ कोटी ७७ लाख रुपये थकबाकीची रक्कम वाढली आहे. सद्यस्थितीत कोल्हापूर जिल्ह्यातील या अकृषक ६ लाख ९१ हजार ४३० वीजग्राहकांकडे ३६७ कोटी ५६ लाख रुपयांची थकबाकी आहे.
      कृषी ग्राहक वगळता उर्वरित सर्व वर्गवारीमधील उच्च व लघुदाब ग्राहकांना चालू वीजबिलाची रक्कम भरण्यासाठी सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. त्यासाठी डाऊन पेमेंट करण्याची गरज नाही. तसेच ज्या ग्राहकांचा वीजपुरवठा सध्या सुरु आहे मात्र वीजबिल थकीत आहे अशा तसेच तात्पुरता किंवा कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या थकबाकीदार ग्राहकांनी ३० टक्के डाऊन पेमेंट करून सुलभ हप्त्यांच्या योजनेत सहभाग घेतल्यास त्यांना सुलभ हप्त्यांची सोय उपलब्ध आहे. सोबतच खंडित झालेली वीजजोडणी पुनर्जोडणी शुल्क भरून किंवा सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाल्यास नवीन वीजजोडणी घेण्याची सोय आहे.
       कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे राज्यात मार्चमध्ये लॉकडाऊन सुरु झाल्याने प्रामुख्याने उद्योगधंदे व व्यवसाय ठप्प झाले होते. परिणामी विजेच्या मागणीत मोठी घट झाल्याने महावितरणच्या आर्थिक चणचणीला सुरवात झाली. अनलॉकनंतर विजेची मागणी वापर वाढल्याने पूर्वपदावर आली आहे. मात्र एकीकडे वीजबिलांच्या रकमेचा भरणाच होत नाही त्यामुळे दुसरीकडे महावितरणला अन्य कंपन्यांची व इतर देणी देणे अशक्य होऊन बसले आहे. अशा गंभीर आर्थिक कोंडीमध्ये वीजबिलांचा भरणा न झाल्यास महावितरणचे अर्थचक्र ठप्प होण्याची शक्यता आहे. 
      वीजबिल भरणा केंद्रासोबतच लघुदाब वर्गवारीतील सर्व वीजग्राहकांना घरबसल्या महावितरणची www.mahadiscom.in ही वेबसाईट, मोबाईल अॅप किंवा इतर ‘ऑनलाईन’ पर्यांयाद्वारे वीजबिलांचा भरणा करण्याची सोय उपलब्ध आहे. यासोबतच ‘लॉकडाऊन’मधील वीजबिलांबाबत शंका असल्यास त्याची घरबसल्या पडताळणी किंवा तपशील हा https://billcal.mahadiscom.in/consumerbill/ या लिंकवर उपलब्ध आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!