• सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत कोल्हापूर केंद्राची स्थापना
कोल्हापूर • प्रतिनिधी
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या कोल्हापूर केंद्राची स्थापना नुकतीच करण्यात आली. प्रतिष्ठानच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये सामाजिक भान असलेले बांधकाम व्यावसायिक व्ही. बी. पाटील यांची केंद्राच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली.
ज्येष्ठ नेते शरद पवार अध्यक्ष असलेल्या या प्रतिष्ठानची स्थापना १९८५ मध्ये करण्यात आली. शिक्षण, आरोग्य, महिला, युवा आणि सांस्कृतिक, सामाजिक अशा विविध क्षेत्रामध्ये गेल्या अनेक वर्षामध्ये प्रतिष्ठानने रचनात्मक काम केले आहे. राजर्षि शाहू महाराजांच्या स्मृती शताब्दी वर्षाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. नुकत्याच कोल्हापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या समवेत झालेल्या बैठकीत या केंद्राच्या स्थापनेला अंतिम स्वरूप देण्यात आले.
व्ही. बी. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, रोहित पाटील सचिव, अशोक पोवार खजानिस, डॉ.मंजुश्री पवार, सीमा पाटील, पद्मजा तिवले, रमेश मोरे, रविराज पोवार, मारूती खापरे यांची केंद्राचे सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच डॉ. भगवान हिर्डेकर, पवन खेबूडकर, डॉ. रणधीर शिंदे, कृष्णात दिवटे, डॉ. भारती पाटील, प्रा. गजानन साळोखे, समीर देशपांडे यांची विशेष निमंत्रित सदस्य म्हणून या केंद्रावर नियुक्ती करण्यात आली आहे.
कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या कोल्हापूर केंद्राच्या पहिल्या बैठकीत परस्पर परिचय आणि माहितीपटाद्वारे प्रतिष्ठानच्या यापुढील कालावधीतील निश्चित ध्येयधोरणांची माहिती देण्यात आली. यापुढच्या काळात जिल्ह्यातील विविध संस्थांच्या सहकार्य व सहभागाच्या माध्यमातून प्रतिष्ठानच्यावतीने समाजउपयोगी उपक्रम राबवण्याचा मानस केंद्राचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केला आहे.