घोडावत विद्यापीठाच्या डॉ.अभिनंदन पाटील यांना ऑस्ट्रेलियन पेटंट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      संजय घोडावत विद्यापीठाच्या स्कुल ऑफ फार्मसी विभागाचे सहयोगी प्राध्यापक डॉ.अभिनंदन पाटील यांना ऑस्ट्रेलियन पेटंट मिळाले आहे. जखम भरून येण्यासाठी सिल्क फायबरचा उपयोग करून नॅनोड्रेसिंग मटेरियल त्यांनी तयार केले आहे. या संशोधनाची जागतिक पातळीवर दखल घेऊन हे संशोधन ऑस्ट्रेलियाच्या इनोव्हेशन युटिलिटी पेटंट म्हणून प्रसिद्ध झाले आहे.
    डॉ. अभिनंदन पाटील यांनी मिळविलेल्या या आंतरराष्ट्रीय बहुमानाबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले व कुलगुरु डॉ.अरुण पाटील यांनी त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले आहे.
      याबद्दल बोलताना डॉ.अभिनंदन पाटील म्हणाले की, कोणत्याही जखमेला ड्रेसिंग केले तर दर दोन दिवसांनी ते ड्रेसिंग बदलावे लागते परंतु आम्ही तयार केलेल्या नॅनो ड्रेसिंग मुळे एकदा केलेले ड्रेसिंग जखम पूर्ण बरी झाल्यावरच काढू शकतो. हे ड्रेसिंग मटेरियल तयार करण्यासाठी झिंक ऑक्साईड नॅनोपार्टिकल चा उपयोग करण्यात आला आहे. हे मटेरियल अँटीबॅक्टेरियल म्हणून काम करते त्यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते. हे ड्रेसिंग मटेरियल प्लास्टिक च्या पातळ थरासारखे दिसत असून बँडेज लावले गेले आहे असा पेशंटला भासदेखील जाणवत नाही.
      या यशाबद्दल स्कुल ऑफ फार्मसी विभागाचे अधिष्ठाता डॉ.श्रीनाथ यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, कुलसचिव डॉ.एन.के. पाटील, संचालक डॉ.व्ही.व्ही.कुलकर्णी, अकॅडमिक डीन डॉ.उत्तम जाधव यांनी त्यांचे अभिनंदन केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!