अपुर्ण अवस्थेतील पाटबंधारे प्रकल्पांकरीता निधी उपलब्ध करा

Spread the love


• खासदार संजय मंडलिक यांची मागणी     
कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्ह्यातील अपुर्ण अवस्थेमध्ये असलेले पाटबंधारे प्रकल्प पुर्ण करणेसाठी आवश्यक असणारा निधी तातडीने मिळावा, अशी मागणी  खासदार संजय मंडलिक यांनी जलसंपदा मंत्री नाम. जयंत पाटील यांचेकडे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे पूर परिस्थितीच्या आढावा बैठकीदरम्यान केली. 
      या बैठकीस आ. राजेश पाटील, जिल्हाधिकार दौलत देसाई, पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता सुर्वे, यांच्यासह कार्यकारी अभियंता, पुनर्वसन अधिकारी उपस्थित होते.
       दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सन २०१९ च्या पूरपरिस्थितीची आठवण करुन देत खासदार संजय मंडलिक यांनी पावसाळ्यामध्ये महापुरामुळे गंभीर परिस्थिती निर्माण होत असल्याने पुरामूळे कमीतकमी क्षेत्र बाधीत होणेच्यादृष्टीने पूर प्रतिबंधक उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे या बैठकीदरम्यान सांगितले. 
      यासंदर्भात खासदार मंडलिक यांनी राधानगरी धरणास सात स्वयंचलित दरवाजे असून धरण पूर्ण क्षमतेने भरल्यानंतरच दरवाजे उचलले जाऊन धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु होतो. कोल्हापूर शहराचे पूरनियंत्रणासाठी धरणातून विसर्ग करणेसाठी रेडियल गेट बसविणे गरजेचे आहे. तथापि यासाठी वेळ लागणार असल्याने धरणाचे सर्व्हिस गेटचे ऑटोमायजेशन केले तरी पुरावर नियंत्रण येणार आहे. यासाठी सुमारे ४ कोटी निधीची आवश्यकता असल्याचे सांगितले. 
     यासंदर्भात जलसंपदा विभागाचे सचिव श्री. गुणे यांनी सदरची कल्पना चांगली असून यावर आम्ही विचार करत असल्याचे खासदार मंडलिक यांना सांगितले.
     पंचगंगा नदीला येणाऱ्या पुरामध्ये धामणी खोऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा समावेश आहे. धामणी नदीवरील धामणी प्रकल्पाचे बांधकाम अपूर्ण असल्यामुळे प्रकल्पाच्या पाणलोट क्षेत्रातून येणारे ८ ते १० टीएमसी पाणी हे अनियंत्रित पध्दतीने पंचगंगा खोऱ्यात येते. सदर प्रकल्प पूर्ण झाल्यास धामणी खोऱ्यामधील पाणी नियंत्रण पध्दतीने पंचगंगा खोऱ्यात सोडून पुरावर काही प्रमाणात नियंत्रण आणता येईल. याकरिता धामणी प्रकल्पास आवश्यक निधी देऊन धामणी प्रकल्पाचे काम तातडीने पूर्ण करणे गरजेचे असल्याचे खास.मंडलिक यांनी बैठकीत सांगितले.
      खासदार मंडलिक यांनी बैठकीदरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील धामणी (ता.राधानगरी), आंबेओहळ (ता.आजरा), सर्फनाला (ता.आजरा) हे तीन मध्यम प्रकल्प व उचंगी (ता.आजरा), नागणवाडी (ता.भुदरगड) तसेच सोनुर्ले (ता.शाहुवाडी) हे तीन लघू प्रकल्प असे एकूण सहा पाटबंधारे प्रकल्प गेली अनेक वर्षे पुनर्वसन व पुरेशा निधी अभावी रखडल्याचे सांगून सदर प्रकल्प पुर्ण होण्याच्यादृष्टीने ह्या प्रकल्पांतर्गत प्रलंबीत अडचणींचा तातडीने निपटारा होण्याकरीता आवश्यक असणारा निधीची मागणी नाम.जयंत पाटील यांच्याकडे केली असता सदरचा निधी लवकरात लवकर देत असल्याचे ग्वाही नाम.जयंत पाटील यांनी दिली तर धामणी प्रकल्पासंदर्भात येत्या सोमवारी स्वतंत्र बैठक आयोजित करत असल्याची माहिती नाम.पाटील यांनी दिली. 
———————————————– Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!