सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला आवाडे गटाचा पाठिंबा जाहीर

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
      गोकुळ दूध संघाचे काम अत्यंत व्यवस्थित आणि सुरळीत सुरू आहे. सहकार क्षेत्रातील एक आदर्श संस्था म्हणून गोकुळ दूध संघ देशभर नावाजला जातो. सत्तारूढ गटाचे नेते आमदार पी.एन.पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, ज्येष्ठ संचालक अरूण नरके यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ संघाने मोठी भरारी घेतली आहे. विशेष म्हणजे अडचणीच्या काळात जेव्हा संपूर्ण राज्यात दुधाचे दर कमी झाले होते, त्यावेळी सत्तारूढ गटाने दुधाचा खरेदी दर कमी न करता, उत्पादकांना पाठबळ दिले होते. या सर्व पार्श्‍वभूमीवर, गोकुळच्या विकासाचा वेग कायम रहावा, यासाठी सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला पाठींबा देत असल्याचे आमदार प्रकाश आवाडे यांनी आज जाहीर केले. जिल्हयातील अनेक मातब्बर नेते मंडळींचा पाठिंबा मिळत असल्याने, सत्तारूढ आघाडीने प्रचार यंत्रणेत मोठी आघाडी घेतली आहे.
       गोकुळ दूध संघाच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी २ मे रोजी मतदान होत आहे. कालच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी आणि आजर्‍यातील अशोक चराटी यांनी सत्तारूढ गटाला पाठिंबा दिला. तर आज आमदार प्रकाश आवाडे यांनी, गोकुळमधील सत्तारूढ राजर्षि शाहू आघाडीला पाठिंबा जाहीर केला. देशपातळीवर नावाजलेल्या गोकुळचा कारभार उत्तम आणि पारदर्शी आहे, असेही त्यांनी नमूद केले. गोकुळ सहकार क्षेत्रातील अत्यंत नावाजलेली आणि आदर्शवत कार्य करणारी संस्था असून, त्याची प्रगती सुरू ठेवण्यासाठी आपण हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
      दरम्यान, आमदार पी. एन. पाटील, माजी आमदार महादेवराव महाडिक, माजी खासदार धनंजय महाडिक यांनी आमदार आवाडे यांच्या कोल्हापुरातील निवासस्थानी भेट देवून त्यांच्या निर्णयाचे स्वागत केले. त्यानंतर या नेत्यांमध्ये निवडणुकीसंदर्भात चर्चा झाली. चर्चेत जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे, जवाहर साखर कारखान्याचे संचालक अभय काश्मिरे, माणगावचे सरंपच राजू मगदूम सहभागी झाले होते.
     आमदार आवाडे म्हणाले, आपण गेली अनेक वर्षे सहकार क्षेत्रात कार्यरत आहे. सहकारी संस्था व्यवस्थित चालवण्यासाठी किती परिश्रम घ्यावे लागतात, याची आपल्याला जाणीव आहे. सत्तारूढ गटाने चांगले कामकाज करत, दूध उत्पादक शेतकर्‍यांना आर्थिक पाठबळ दिले आहे. तसेच जेव्हा संपूर्ण राज्यात दुधाचा दर उतरला होता, त्यावेळी गोकुळ दुध संघाने मात्र सभासदांकडून, ठरलेल्या दरानेच दूध खरेदी केले होते. ही बाब  दूध उत्पादक सभासद कधीही विसरणार नाहीत, असे आवाडे यांनी आवर्जून नमूद केले. लॉकडाऊन असो किंवा कोणतीही नैसर्गिक आपत्ती, गोकुळ दूध संघाने नेहमीच आपल्या सभासदांचे हित जोपासल्याचे आवाडे यांनी सांगितले.
     आवाडे गटाच्या पाठींब्यामुळे सत्तारूढ गटाला आणखी बळ मिळाल्याची प्रतिक्रिया, आमदार पी.एन.पाटील यांनी व्यक्त केली. आमदार आवाडेंचा सहकार क्षेत्रातील अनुभव, गोकुळसाठी मार्गदर्शक ठरेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. दूध उत्पादक शेतकर्‍यांच्या हितासाठी सर्वांनी एकत्र कार्यरत राहू, असे धनंजय महाडिक यांनी सांगितले.
सत्तारूढ गटाला दूध उत्पादक सभासद आणि महत्त्वाच्या नेत्यांचे पाठबळ मिळत असल्याने, सत्तारूढ गटाची स्थिती भक्कम बनल्याचे स्पष्ट दिसते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!