कोल्हापूर • प्रतिनिधी
संजय घोडावत पॉलीटेक्निकच्या मेकॅनिकल विभागाचे विभागप्रमुख प्रा.प्रशांत महावीर पाटील यांना आनंदगंगा फौंडेशनच्यावतीने ”आदर्श शिक्षक” या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या पुरस्काराचे वितरण खासदार धैर्यशील माने व शिक्षण सभापती प्रवीण यादव यांच्या हस्ते करण्यात आले. प्रा. पाटील यांनी सहकुटुंब हा पुरस्कार स्वीकारला. यावेळी तानाजी पवार, विश्वस्त विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रा. प्रशांत पाटील हे गेली १२ वर्षे शिक्षण क्षेत्रात प्राध्यापक म्हणून काम करीत आहेत. शिक्षण क्षेत्रात एक उपक्रमशील शिक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे. त्यांनी नामवंत अशा टेक्निकल पब्लिकेशनसाठी मेकॅनिकल डिप्लोमा इंजिनीरिंग अभ्याक्रमावर ४ पुस्तके प्रकाशित केली आहेत. महाराष्ट्रातील डिप्लोमा इंजिनीरिंगचे सर्व विद्यार्थी त्यांची पुस्तके संदर्भासाठी वापरतात. प्रा.पाटील यांनी संशोधनामध्येही आपले योगदान देत आंतराष्ट्रीय स्तरावर १० हुन अधिक शोधनिबंध प्रकाशित केले आहेत. गरीब होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे यासाठी ते नेहमी प्रयत्नशील असतात. त्यांनी समुपदेशित केलेली आज हजारो विद्यार्थी देश विदेश पातळीवर उच्च पदावर काम करीत आहेत.
प्रा. पाटील यांना शिक्षणाबरोबरच सामाजिक कार्याचीदेखील आवड आहे. त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी एकत्र येऊन रुकडी परिसरात ”आधार फौंडेशन” स्थापन केले व या फौंडेशनच्या माध्यमातून त्यांनी दुष्काळ, महापूर, कोरोनाच्या संकटामध्ये सामाजिक भान जपून गरजूना मदत केली आहे. इतकेच नव्हे तर त्यांच्यामार्फत ऊसतोड कामगारांना अन्न वस्त्र, करुणालयांना मदत, वृद्धाश्रम, अंधअपंग शाळाना मदत पुरविण्याचे कार्य केले आहे. तसेच रुकडी येथे फौंडेशनमार्फत हजारो झाडांचे संगोपन करून ऑक्सिजन पार्क उभारले आहे.
या पुरस्काराबद्दल संजय घोडावत विद्यापीठाचे अध्यक्ष संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले व संजय घोडावत पॉलीटेकनिकचे प्राचार्य विराट गिरी यांनीही त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
——————————————————-