कोल्हापूर • प्रतिनिधी
स्वच्छता संकल्प देश का, हर रविवार विशेष सा.. या उपक्रमांतर्गत सिंगल यूज प्लॅस्टिकपासून मुक्ती या विषयावर रविवारी शहरात जनजागृती करण्यात आली.
प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व उप आयुक्त निखिल मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती करण्यात आली. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, बिंदू चौक, दसरा चौक, व्हिनस कॉर्नर, छत्रपती राजाराम चौक, भवानी मंडप, कपिलतीर्थ मार्केट, महाद्वार रोड, दाभोळकर कॉर्नर, राजारामपुरी, शाहूपुरी परिसरात सिंगल यूज प्लॅस्टिकबाबत सायकल रॅलीद्वारे तसेच शहरातील मुख्य चौकात हातामध्ये प्लॅस्टिक बंदीबाबत जनजागृती करणारे फलक घेवून लोकांचा सहभाग घेऊन जनजागृती करण्यात आली. त्याचबरोबर शालेय विद्यार्थी, वाहतूक पोलिस शाखेच्या स्नेहा गिरी व पोलिस कर्मचाऱ्यांनी शहरातील रिक्षा स्टॉप, फुलविक्रेते, भाजी मार्केट, मुख्य बाजारपेठ परिसरामध्ये जनजागृती केली. या मोहिमेअंतर्गत नागरीक, पोलिस कर्मचारी, भाजी व फुल विक्रेते यांना महापालिकेमार्फत कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.
ही जनजागृती स्थानिक नागरिक, माहिती शिक्षण व संवाद अधिकारी निलेश पोतदार, स्वच्छतादूत अमित देशपांडे, पर्यावरण सहाय्यक केवल लोट व कर्मचारी नागेश देसाई उपस्थित होते.