कोल्हापूर • प्रतिनिधी
राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक भूमिका घेतली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजातील युवकांना इतर माध्यमातून न्याय मिळण्यासाठी पावले उचलली आहेत. त्याचाच एक भाग म्हणून अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून मराठा समाजातील उद्योजकांना सक्षम बनविण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. याकरिता कर्जपुरवठा योजना प्रक्रियेत सुलभता आणून, पात्र लाभार्थ्यांना कर्जपुरवठा होण्यासाठी कागदपत्रांबाबत जनजागृती करावी, अशा सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दि.२७ जुलै रोजीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोल्हापूर जिल्ह्याकरिता ऑनलाईन माहिती शिबिराचे आयोजन करण्यात येणार असल्याचे राजेश क्षीरसागर यांनी सांगितले.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळा अंतर्गत जिल्हा उद्योग केंद्र, जिल्हा अग्रणी बँका, सहकारी आणि खाजगी बँकांची बैठक आज शासकीय विश्रामगृह, कोल्हापूर येथे पार पडली.
बैठकीच्या सुरवातीस राजेश क्षीरसागर यांनी आजपर्यंत किती उमेदवारांनी अर्ज केले, त्यातील किती लाभार्थ्यांना कर्जपुरवठा करण्यात आला, त्यातील किती लाभार्थी नियमितपणे कर्ज फेडत आहेत आणि त्यातील किती लाभार्थ्यांना व्याज परतावा सुरु आहे आदी महामंडळाच्या कामकाजाची माहिती घेतली.
यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने यांनी, वैयक्तिक कर्ज योजनेत आजतागायत सुमारे ६ हजार अर्ज प्राप्त झाले असून २५७७ लाभार्थ्यांना सुमारे २१६ कोटी रुपयांचा कर्ज पुरवठा करण्यात आला असून, त्यातील २२५३ लाभार्थ्यांना १३ कोटी रुपयांचा व्याज परतावा करण्यात आला असल्याची माहिती दिली. यासह जिल्ह्याच्या अंतर्गत येणाऱ्या ५५ अग्रणी व सहकारी बँका व ३७ खाजगी बँकामार्फत कर्जपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती दिली.
यावर राजेश क्षीरसागर यांनी, सुमारे ६ अर्ज प्राप्त झाले असताना २५७७ लाभार्थ्यांना कर्ज प्राप्त झाले. त्यातील उर्वरित लाभार्थ्यांना कर्ज का प्राप्त होऊ शकले नाही अशी विचारणा केली. यावर जिल्हा समन्वयक यांनी, बँकांकडून लाभार्थ्यांना कर्जपुरवठा सुरळीतपणे सुरु असून, कागदपत्रांच्या अभावी उर्वरित प्रकरणे प्रलंबित असल्याचे सांगितले. यावर तात्काळ कर्ज योजनेविषयी आवश्यक सर्वच कागदपत्रांबाबत महामंडळाने जनजागृती करावी. बँकांनी लाभार्थ्यांना पूर्ण सहकार्य करावे, कोणी कर्ज बुडवेल अशी धारणा ठेवून गरजू लाभार्थ्यांना योजनेपासून वंचित ठेवू नये, कर्ज योजनेत काही बँका मालमत्ता गहाण ठेवून घेत आहेत. याबाबत जनजागृती करावी, अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे श्री.शेळके, कौशल्य विकास रोजगारचे सहाय्यक आयुक्त संजय माळी, बँक ऑफ इंडिया अग्रणी जिल्हा प्रबंधक राहुल माने, महामंडळाचे जिल्हा समन्वयक सतीश माने आदी राष्ट्रीयकृत बँक, सहकारी बँक आणि खाजगी बँकाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
——————————————————- Attachments area