अखेर बालगोपालने साकारला विजय!

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      केएसए चषक वरिष्ठ गट साखळी फुटबॉल स्पर्धेत पाच सामने बरोबरीत राहिलेल्या बालगोपाल तालीम मंडळने अखेर विजय साकारला. खंडोबा तालीम मंडळ (अ) विरूद्ध झालेल्या सहाव्या फेरीतील सामन्यात बालगोपालने विजयासह ३ गुण मिळवले. त्यांच्या खात्यावर एकूण ८ गुणांची नोंद झाली. खंडोबा (अ)चे ४ गुण झाले आहेत. तत्पूर्वी झालेल्या सामन्यात झुंजार क्लबने उत्तरेश्वर प्रासादिक वाघाची तालीम मंडळवर निसटता विजय मिळवला. झुंजार क्लब १० तर उत्तरेश्वर ७ गुणांवर आहे.
      छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या केएसए चषक स्पर्धेत शुक्रवारी झालेल्या सामन्यात रोहित कुरणेने दिलेल्या पासवर अभिनव साळोखे याने ४१व्या मिनिटास गोल केला. उत्तरार्धात नोंदवलेल्या या एकमेव गोलच्या जोरावर बालगोपालने विजयाला गवसणी घातली. खंडोबाकडून प्रभू पोवार, श्रीधर परब, अजिज मोमीन, अक्षय मोळे यांनी अखेरपर्यंत गोलची परतफेड करण्यासाठी प्रयत्न केले पण त्यांना यश आले नाही.
       तत्पूर्वी झालेला झुंजार क्लब आणि उत्तरेश्वर सामना बरोबरीत सुटेल अशी स्थिती असताना झुंजारकडून झालेल्या चढाईला यश आले. त्यांच्या करण पाटीलने दिलेल्या पासवर अवधूत पाटोळेने ७९व्या मिनिटास गोल नोंदवून संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
                      स्पर्धेतील विजेत्यास लाखाचे बक्षीस…..
     केएसएचे अध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून केएसए चषक फुटबॉल स्पर्धेसाठी एकूण दोन लाख पन्नास हजारची बक्षिसे जाहीर करण्यात आलेली आहेत. स्पर्धेतील विजेता संघास एक लाख रुपये तर उपविजेत्या संघाला ७५,००० रुपये तसेच तिसऱ्या क्रमांकास ५०,००० रुपये आणि चौथा क्रमांकास २५,००० रुपये बक्षीस दिले जाणार आहे.
                           पुढे होणारे सामने…..
• दि.१९: ऋणमुक्तेश्वर – सम्राटनगर स्पोर्टस
              दिलबहार – बीजीएम स्पोर्टस
• दि.२१: झुंजार क्लब – सम्राटनगर स्पोर्टस
              खंडोबा (अ) – बीजीएम स्पोर्टस
• दि.२३: उत्तरेश्वर – ऋणमुक्तेश्वर
              बालगोपाल – दिलबहार
• दि.२४: पोलिस संघ – पीटीएम (ब)
              पीटीएम (अ) – शिवाजी
• दि.२५: खंडोबा (ब) – जुना बुधवार
              प्रॅक्टीस – फुलेवाडी 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!