गावागावांत देशी वाणांच्या बॅंका उघडल्या पाहिजे: पद्मश्री राहीबाई पोपेरे

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      गावागावात जशा आर्थिक उलाढाली करणाऱ्या बँका आहेत, त्याच धर्तीवर गावागावांत देशी वाणांच्या बॅंका उघडल्या पाहिजेत, असे मत पद्मश्री राहीबाई पोपेरे यांनी व्यक्त केले. देशी बीयांच्या वाणांच्या रक्षणार्थ केलेल्या कामाबद्दल मिळालेल्या पद्मश्री पुरस्कार स्विकारल्यानंतर प्रथमच राहीबाई पोपेरे १५व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने पुण्यात आल्या होत्या, त्यावेळी त्यांनी संवाद साधला.
      यावेळी व्यासपीठावर महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, बायफ या संस्थेचे संजय पाटील आणि जितीन राठी उपस्थित होते.
       महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी इंडियन इन्स्टि्यट ऑफ मिलियन्टस रिसर्च या संस्थेस वसुंधरा मित्र ऑर्गनायझेशन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे संचालक आणि ज्येष्ठ संशोधक डॉ. विलास टोणपी यांनी हा पुरस्कार स्वीकारला. पुणेरी पगडी, शाल आणि स्मृतीचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
      यावेळी गौरी किर्लोस्कर म्हणाल्या की, तरुणांना आणि समाज घटकांना सामावून घेत आपल्याला आपल्या खाण्यातील बदल घडवून आणावा लागणार आहे. विषमुक्त अन्न प्रत्येकाच्या ताटात आले पाहिजे. यासाठी पिकवणाऱ्या पासून खाणाऱ्यापर्यंत सर्वच स्तरांवर जागृती होणे आवश्यक आहे.
      पद्मश्री राहीबाई पोपेरे म्हणाल्या की, मी माझा पद्श्री पुरस्कार माझ्या काळ्या मातीला आणि देशी वाणांच्या बियांना सर्मपित करीत आहे. या काळ्या मातीनेच मला ओळख दिली. चेहरा प्राप्त करुन दिला. घरची परिस्थिती गरीब असल्याने औपचारिक शिक्षण नाही होऊ शकले पंरतु वडिलांसोबत शेतीत काम करतांना  अनौपचारिक शिक्षणाचे खूप धडे गिरविले आणि ते आचरणात आणले. आज आपण पैसे देऊन विषारी अन्न विकत घेत आहोत. आपण जे अन्न खातो ते कुठून येते, त्याच्यावर नक्की काय प्रक्रिया होते, ती प्रक्रिया होत असतांना नक्की त्याच्यावर कोणत्या रसायनांचा मारा होतो आहे या सर्वांपासून आपण खूप अनभिज्ञ आहोत. आधुनिक जीवनशैलीच्या नावाखाली आपण चुकीचे वर्तन आचरणात आणत आहोत. ज्यात चमक आहे, पण त्यात धमक नसते.
      यावेळी वीरेंद्र चित्राव म्हणाले की, येत्या काळात महाविद्यालयीन स्तरावर सकस आणि पोषक आहार चळवळ उभी करण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!