तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सज्ज रहावे : आ. चंद्रकांत जाधव


कोल्हापूर • प्रतिनिधी
      महाराष्ट्रामध्ये कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेने कहर केला आहे. कोल्हापूर शहरालादेखील दुसर्‍या लाटेचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला आहे. वैद्यकीय तज्ञानी कोरोना संसर्गाची तिसरी लाट लवकरच येण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे तिसर्‍या लाटेचा धोका आत्ताच लक्षात घेऊन वेळीच कडक उपाययोजना तसेच धोरणाची कडक अमलबजावणी करणे गरजेचे झालेले आहे. याकरिता महापालिका प्रशासनाने सज्ज रहावे, अशी सूचना आमदार चंद्रकांत जाधव यांनी दिल्या.
      कोल्हापूर शहरातील कोरोनाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. महापालिकेचे प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे उपस्थित होत्या.
      आ. जाधव म्हणाले, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील संसर्ग अजून तीव्र आहे. कोल्हापूरला रेड झोनमधून ग्रीन झोनमध्ये आणण्याबरोबरच तिसऱ्या लाटेची पूर्वतयारी आपणास करावी लागणार आहे. होम आयसोलेशन बंद करून, कोविड केअर सेंटर वाढवी लागणार आहेत व सर्व रुग्णांना कोविड सेंटरमध्ये आयसोलेट करा. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण ही महत्वाची उपचारपद्धती आहे. त्यामुळे महापालिकेने लसीकरण केंद्र वाढवावीत. वयोवृध्द, आजारी व अपंग यांना लसीकरणासाठी महापालिकेने वाहन उपलब्ध करून द्यावे. महापालिकेच्या तसेच खाजगी रुग्णालयामध्ये औषधसाठा हा वेळीच उपलब्ध झाला पाहिजे. प्रत्येक रुग्णालयामध्ये बेड क्षमतेच्या ५० टक्के औषध साठा उपलब्ध असणे अनिवार्य आहे. औषधांचा काळाबाजार होता कामा नये. महापालिकेच्या तसेच सर्व खाजगी रुग्णालयामध्ये समुपदेशक तसेच फिजिओथेरीफीस्ट तज्ञांची निवड करण्यात यावी, यामुळे रुग्णाच्या मनातील भीती कमी करून योग्य उपचार करणे शक्य होणार आहे.
कोरोनाची तिसरी लाट ही लहान मुलांसाठी घातक ठरू शकते त्यामुळे लहान मुलांसाठी बालरोगतज्ञ तसेच संसर्गजन्य रोग तज्ञाच्या उपलब्धतेसह अत्याधुनिक सुविधासह  सुसज्ज रुग्णालये व लसीकरण केंद्रे तयार करावीत. तसेच “माझे कुटूंब- माझी जबाबदारीच्या” धर्तीवर “आपल मुल – आपली जबाबदारी” ही या संकल्पनेवर जनजागृती करावी, असे आवाहन आमदार जाधव यांनी केले.
     कोरोना संसर्गाच्या तिसर्‍या लाटेचा सामना करण्यासाठी महापालिका प्रशासनाने सज्ज रहाणेबाबत सर्व संबधित विभागांना त्वरित निर्देश द्यावेत, अशी सूचना आमदार जाधव यांनी दिली.
      यावेळी उपायुक्त निखिल मोरे, प्रभारी शहर अभियंता नारायण भोसले, उपशहर अभियंता एन. एस. पाटील, हर्षजीत घाटगे, बाबूराव दबडे, आरोग्य अधिकारी डाॅ. पोळ, डाॅ.पवार, इस्टेट ऑफिसर सचिन जाधव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *