तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे: ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

Spread the love


कोल्हापूर • (जिल्हा माहिती कार्यालय)
     कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरुन प्रशासनाने सज्ज रहावे त्याचबरोबर लहान बालकांसाठी राखीव बेड, पुरेसा औषधसाठा आदी वैद्यकीय सेवा-सुविधा वाढवाव्यात अशा सूचना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिल्या.
      जिल्हाधिकारी कार्यालयात आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आजार प्रतिबंध उपाययोजना आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, महानगरपालिका आयुक्त डॉ.कादंबरी बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
      जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेऊन प्रशासनाने १ हजार ५०० बेड वाढवावेत, असे आदेश देऊन जिल्ह्यातील म्युकर मायकोसिसच्या रुग्णांकरीता सुमारे ३४० इंजेक्शन उपलब्ध झाले असल्याचे सांगून श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या वाढत्या संख्येचा विचार करता गडहिंग्लज उपजिल्हा रुग्णांलयात १०० ऐवजी २००, मुरगुड ग्रामीण रुग्णांलयात २५ ऐवजी ५० तर कोडोली ग्रामीण रुग्णांलयात १०० बेड निर्माण करण्यात येणार असून इचलकरंजीतील आयजीएम रुग्णांलयातही बेड वाढविण्यात येणार असून सिटी स्कॅन यंत्रणा कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
      श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले की, जिल्ह्यातील कोविड मुळे झालेल्या मृत्यूदराचे ऑडीट करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात यावी तसेच ज्या रुग्णांलयानी जास्त बिले घेतली आहेत अशांची तपासणी करण्यात यावी त्याचबरोबर व्हेंटिलेटर बेडच्या उपलब्धतेसाठी डॅश बोर्ड तयार करण्यात यावा अशी सूचना करुन मे महिन्याअखेर कोरोना आजाराचा ग्राफ (आलेख) खाली येईल असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. जिल्ह्यासाठी लवकरच ग्रामविकास विभागाच्या वतीने यंत्रसामुग्रीने युक्त अशी कार्डियाक रुग्णवाहिका देण्यात येईल त्याचबरोबर रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाची कमतरता भासू नये यादृष्टीने शासकीय रुग्णालयांतून सेवानिवृत्त होणाऱ्या डॉक्टरांना एक वर्ष मुदतवाढ देण्याबाबत विचार सुरु असल्याचेही ते म्हणाले.
      यावेळी त्यांनी कोविड व म्युकर मायकोसिसच्या नियंत्रणासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजना, बेड व्यवस्थापन, लहान मुलांसाठी आरोग्य सुविधा, औषध पुरवठा, लसीकरणाची सद्यस्थिती, शासकीय आणि खासगी रुग्णालयातील सोयी-सुविधा आदी बाबींचा आढावा घेतला.
      जिल्हाधिकारी दौलत देसाई म्हणाले, जिल्ह्यातील रुग्णदर व मृत्युदर कमी होण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाने मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये अधिकाधिक रुग्ण हे ज्येष्ठ अथवा सहव्याधीग्रस्त असल्याचे दिसून येते. कोरोना प्रतिबंधक लस ही जिल्ह्यातील ६० वर्षांवरील नागरिकांना तसेच सहव्याधीग्रस्त नागरिकांना उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात येईल, जेणेकरून मृत्युदर नियंत्रणात येवू शकेल. तिसऱ्या लाटेच्या दृष्टीने लहान बालकांसाठी सीपीआर मध्ये नवीन १५ व्हेंटिलेटरची सोय करुन देण्यात येत आहे. त्याचबरोबर शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये बालकांसाठी खाटा राखीव ठेवण्यात येत आहेत.
     तत्पूर्वी वैद्यकीय अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, महानगरपालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक पोळ यांनी जिल्ह्यातील आरोग्य विभागाच्या वतीने कोरोना प्रतिबंधासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
———————————————– Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!