शिवाजी विद्यापीठात मियावाकी जंगल निर्मितीस प्रारंभ

•१३ प्रजातींच्या एकूण ९५८ रोपांची लागवड
कोल्हापूर • प्रतिनिधी
     जलसंवर्धनाच्या कामाबरोबरच आता शिवाजी विद्यापीठाने गर्द वनराईची निर्मिती हाती घेऊन जैवविविधता विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले.
     शिवाजी विद्यापीठ परिसरात आज मियावाकी जंगल (दाट वनराई) निर्मितीच्या अभिनव उपक्रमास कुलगुरू डॉ. शिर्के यांच्या हस्ते प्रारंभ करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
     शिवाजी विद्यापीठ परिसरातील जैवविविधता विकासासाठीचे हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे मतही कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केले.
     मियावाकी जंगल ही दाट वृक्षारोपणाची मूळ जपानी संकल्पना असून त्याअंतर्गत विविध प्रकारच्या प्रजातींची गर्द, दाट वनराई होईल, अशाप्रकारे लागवड करण्यात येते. यामुळे सदर परिसरात वनस्पतींच्या वैविध्यतेबरोबरच जैववैविध्यतेचाही मोठ्या प्रमाणात विकास होतो. विविध प्रकारचे पशु-पक्षी या वनराईच्या आश्रयास राहावयास येतात.
     शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा संकुलाच्या शेजारील परिसरामध्ये आज मियावाकी जंगल लागवडीस कुलगुरूंच्या हस्ते जांभूळ रोप लावून प्रारंभ करण्यात आला. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्या हस्ते बहावा आणि कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्या हस्ते कांचन रोपे लावण्यात आली. त्यानंतर या साधारण साडेसात गुंठ्यांच्या परिसरात बहावा, कांचन, जांभूळ, चिंच, विलायती चिंच, फणस, जास्वंद, अडुळसा, रातराणी, तगर, चाफा, धावडा आणि बांबू अशा १३ प्रजातींच्या एकूण ९५८ रोपांची लागवड करण्यात आली.
     ही सर्व रोपे शिवाजी विद्यापीठाच्या रोपवाटिकेत तयार करण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे अशा प्रकारे विद्यापीठाच्या परिसरात दहा विविध ठिकाणी मियावाकी जंगलांची निर्मिती करण्याचा मानस आहे, अशी माहिती उद्यान विभागाचे उपकुलसचिव डॉ. व्ही.एन. शिंदे यांनी या प्रसंगी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *