संशोधन योजनेतून साकारले ‘शिवाजी विद्यापीठातील पक्षीजगत’

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      शिवाजी विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत शिक्षक, संशोधक, विद्यार्थी यांना संशोधनास प्रोत्साहित करण्यासाठी विविध संशोधन योजना जाहीर केल्या. त्यापैकीच असलेल्या ‘रिसर्च स्ट्रेन्दनिंग स्कीम’अंतर्गत प्राणीशास्त्र अधिविभागातील डॉ. एस.एम. गायकवाड यांनी सुमारे दोन वर्षे शिवाजी विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेबाबत संशोधन केले. त्यातून ‘बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस’ हे सुमारे ११८ पानी कॉफीटेबल बुक साकार झाले आहे.  
      डॉ. एस.एम. गायकवाड यांनी दोन वर्षांमध्ये विद्यापीठाच्या ८५३ एकर परिसरामध्ये सातत्याने पक्षीनिरीक्षण केले. विशेषतः कोविड-१९ साथीच्या कालखंडात विद्यापीठ परिसरात मनुष्य हस्तक्षेप अत्यल्प असल्याचा लाभ घेऊन निर्भयपणे मुक्त विहार करणाऱ्या पक्ष्यांचे निरीक्षण करणे, त्यांची छायाचित्रे टिपणे या गोष्टी डॉ. गायकवाड यांना अधिक चांगल्या प्रकारे करता आल्या. त्यांनी सर्वसाधारण व दुर्मिळ अशा सर्व प्रकारचे मिळून सुमारे ११५ पक्षी असल्याचे नोंदविले आहे.
      या ११५ पक्ष्यांची डॉ. गायकवाड यांनी अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रेही टिपली आहेत. या छायाचित्रांचे कॉफी टेबल बुक त्यांनी साकारले आहे. यामध्ये पक्ष्याचे छायाचित्र, त्याची थोडक्यात माहिती आणि जिज्ञासूंना अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी प्रत्येक पक्ष्याच्या पृष्ठावर एक क्यूआर कोड छापला आहे. ज्याला अधिक माहिती घ्यावयाची असेल, त्याने क्यूआर कोड स्कॅन केला की, लगेच त्या पक्ष्याची सविस्तर माहिती त्यांच्या मोबाईलवर दिसेल.
      डॉ. गायकवाड यांना विद्यापीठाच्या ज्या परिसरात जे पक्षी आढळले, त्या ठिकाणी संबंधित पक्ष्याचा सचित्र माहितीफलकही उभारण्यात आला आहे. त्यामुळे परिसरात फिरावयास येणाऱ्या नागरिकांनाही त्या परिसरात कोणत्या पक्ष्याचा आढळ होऊ शकतो, याचा अंदाज येण्यास मदत होते.
    यासंदर्भात बोलताना डॉ. गायकवाड म्हणाले, विद्यापीठाने रिसर्च स्ट्रेन्दनिंग योजनेअंतर्गत प्रोत्साहन निधी दिल्यामुळेच विद्यापीठ परिसरातील जैवविविधतेबाबत संशोधन करता येऊ शकले. त्यातूनच या परिसरात पक्ष्यांच्या सुमारे ११५ प्रजाती असल्याचे निरीक्षण नोंदविता येऊ शकले. कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांचे प्रोत्साहन आणि विभागप्रमुख डॉ. व्ही.एस. मन्ने यांचे सहकार्य यामुळे या पक्ष्यांच्या छायाचित्रांचा समावेश असणारे कॉफीटेबल बुक प्रकाशित करता येऊ शकले.
                  ———-
  ‘विद्यापीठ परिसर सुरक्षित अधिवास’
       शिवाजी विद्यापीठाचा परिसर हा निसर्गरम्य आणि देखणा तर आहेच, पण त्याचबरोबर विविध पशुपक्ष्यांसाठी सुरक्षित अधिवास असल्याचे डॉ. गायकवाड यांच्या संशोधनातून सिद्ध झाले आहे, असे प्रतिपादन कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांनी केले. ‘बर्ड्स ऑन शिवाजी युनिव्हर्सिटी कॅम्पस’ या कॉफीटेबल बुकचे नुकतेच त्यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील, कुलसचिव डॉ. व्ही.डी. नांदवडेकर, डॉ. आर.के. कामत, डॉ. व्ही.एस. मन्ने, डॉ. एम.व्ही. वाळवेकर यांच्यासह प्राणीशास्त्र अधिविभागातील शिक्षक उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!