कोल्हापूर • प्रतिनिधी
संघटन कौशल्य, राष्ट्रसेवेची विचारधारा, संघर्ष, तत्वनिष्ठ असे वेगळेपण असणारा पक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीस ‘पार्टी विथ डिफरन्स’ असे संबोधले जाते. भारतीय जनता पार्टीचा ४१ वा स्थापना दिवस आज भाजपा कोल्हापूरच्यावतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सत्ता हे साध्य नसून साधन आहे, अंत्योदय, सशक्त व संस्कारित-वैचारिक भारत हे ध्येय समोर ठेवत भारतीय जनसंघ ते भारतीय जनता पार्टी असा प्रखर हिंदू राष्ट्रवाद, अखंड मानवतावाद या दोन तत्त्वांशी आजपर्यंत कोणतीही तडजोड न करता भारतीय जनता पार्टीची वाटचाल अखंड सुरु आहे. ६ एप्रिल १९८० ला भारताचे माजी पंतप्रधान स्व.अटल बिहारी वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय जनता पार्टीची स्थापना झाली. डॉ. शामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी असे अनेक दिग्गज नेते भारतीय जनता पार्टीने या देशास दिले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोरोनाची नियमावली पाळून विविध सामाजिक उपक्रम राबवून आजचा स्थापना दिन भाजपा मोठ्या उत्साहात साजरा केला. प्रदेशाध्यक्ष आम. चंद्रकांतदादा पाटील यांच्या कोल्हापूर येथील निवासस्थानी पक्षाचा ध्वज व दारामध्ये रांगोळी काढून स्थापना दिवस साजरा केला. प.म.देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव व भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी सहकुटुंब उपस्थित राहून आपल्या घरावर पक्षाचा ध्वज उभा केला. दारामध्ये कमळाची रांगोळी तसेच घराच्या दारावरती कमळाचे स्टिकर लावून हा स्थापना दिवस साजरा केला.
भाजपाच्या सातही मंडलामध्ये पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, आघाडी-मोर्चा अध्यक्ष व संयोजक तसेच शक्ती केंद्र प्रमुख व बूथ स्तरावरील कार्यकर्त्यांनी पक्षाचा ध्वज लावून मिठाई, साखर पेढे वाटून आनंदोत्सव साजरा केला.
राजारामपुरी येथे भाजपा सरचिटणीस विजय जाधव व सहकाऱ्यांमार्फत गरजू विद्यार्थ्यांना ५००० वह्यांचे वाटप करण्यात आले. ट्रान्सपोर्ट आघाडी अध्यक्ष दिलीप बोंद्रे व रिक्षा आघाडी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ट्रक व रिक्षा यावर भाजपाचा ध्वज लावून आज प्रवास केला.
स्थापना दिनाचे औचित्य साधून जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा कार्यालय बिंदू चौक येथील कार्यालयाला फुलांचे तोरण बांधून फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली. कार्यालयात भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मंगळवार पेठ मंडलच्यावतीने आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत गोल्डन कार्ड वाटप करण्यात आले. मंडल अध्यक्ष संतोष माळी व उपाध्यक्ष अरविंद वडगावकर यांच्यासह भाजपा कार्यकर्त्यांनी भाजपाचा ध्वज लावून स्थापना दिवस साजरा केला.