निवेदन न स्वीकारता अवमान करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपाच्यावतीने निषेध


कोल्हापूर • प्रतिनिधी
     राज्य शासनाने परिचारिकांच्या बदल्या संदर्भात काढलेल्या अध्यादेशाबद्दल निवेदन देण्यासाठी आलेल्या भारतीय जनता पार्टीच्या शिष्टमंडळाचे निवेदन न स्वीकारून आणि वृत्तपत्र छायाचित्रकाराचा कॅमेरा काढून घेण्याचे आदेश देऊन अरेरावी करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा भाजपाने तीव्र शब्दात निषेध केला आहे.
     यासंदर्भात प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोरोना पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काढलेल्या परिचारिकांच्या बदल्यांच्या आदेशाबाबत निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना पूर्वसूचना देऊन व वेळ घेऊन शिष्टमंडळ गेले होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनामध्ये भाजपा शिष्टमंडळ पोचताच जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ पाच कार्यकत्यांनी थांबा तरच निवेदन स्वीकारणार अशी भूमिका घेतली. त्याचबरोबर फोटो घ्यायचे नाहीत असे म्हणत शिष्टमंडळासोबत आलेल्या वृत्तपत्र छायाचित्रकारांचा कॅमेरा जप्त करण्याचा आदेश त्यांनी पोलिसांना दिला. या घटनेचा भारतीय जनता पार्टीच्यावतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून न घेता अचानक अरेरावीवर आलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्ते देऊ लागले. तसेच शिष्टमंडळाने अन्य पक्ष, संघटना, शासकीय मिटिंग यामध्ये आपल्या दालनात गर्दी चालते तर विरोधी पक्ष म्हणून समाजाचे प्रश्न उपस्थित करण्यासाठी आलो असता आम्हाला वेगळा न्याय का ? असा सवाल उपस्थित केला. शिष्टमंडळाने जोरदार घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी यांचा निषेध नोंदवला.  
      यानंतर शिष्टमंडळाच्या आक्रमक भूमिकेवर शिष्टमंडळाचे निवेदन जिल्हाधिकारी यांनी दालनाच्या बाहेर निवेदन स्वीकारू अशी भूमिका घेतली. 
जिल्हाधिकारी दालना बाहेर निवेदन स्विकारण्यासाठी आल्यानंतर भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव निवेदनाचा विषय मांडत असताना पुन्हा सोशल डिस्टन्सिंगचा अनाठायी आग्रह जिल्हाधिकारी धरू लागले. यावर भाजपा पदाधिकारी पुन्हा आक्रमक होऊन जिल्हा पदाधिकारी व प्रेस यांना प्रवेश दिल्याशिवाय निवेदन देणार नाही अशी भूमिका शिष्टमंडळाने घेतली. त्यानंतर जिल्हाधिकारी पुन्हा निवेदन न स्वीकारता दालनामध्ये निघून गेले. 
      यावेळी भाजपा शिष्टमंडळाने सदरचे निवेदन जिल्हाधिकारी दालनाला चिकटवून पुन्हा जिल्हाधिकारी यांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या.
     यानंतर सेवा रुग्णालय कसबा बावडा याठिकाणी जाऊन भाजपा शिष्टमंडळाने सीपीआर परिचारिकांच्या बदल्याबाबत सुरु असणाऱ्या आंदोलनकर्त्यांना भेटून पाठींब्याचे पत्रक दिले. भारतीय जनता पार्टी लोकशाही मार्गाने राज्य सरकारचा निषेध करण्यासाठी प्रसंगी या विषयात रस्त्यावर उतरल्या शिवाय राहणार नाही, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
     यावेळी भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, उपाध्यक्ष चंद्रकांत घाटगे, राजू मोरे, विजय आगरवाल, प्रदीप उलपे, दिग्विजय कालेकर, अजित सूर्यवंशी, गायत्री राउत, अजित ठाणेकर यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *