कोल्हापूर • प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. परंतु महाराष्ट्रातील सरकार फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवून आपले इतर धंदे करण्यात रममान असल्याचे चित्र दिसत आहे. याच्या निषेधार्थ व सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी गुरुवारी भाजपा कोल्हापूरच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केली.
भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. याप्रसंगी बोलताना भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, केंद्राने पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला, त्यामुळे पेट्रोल-डिझेलचे दर ५ ते १० रुपयांनी कमी झाले. या केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. त्याच पद्धतीने महाराष्ट्र राज्याने देखील अद्यापही अबकारी कर का कमी करत नाही असा सवाल केला. लोक हिताचे निर्णय स्वबळावर घेता आले नाहीत तर फक्त केंद्र सरकारकडे बोट दाखवणे इतकीच महाराष्ट्र राज्याची सध्याची भूमिका दिसत आहे घोटाळे, अत्याचार, लुबाडणूक, बलात्कार, खंडणी अशा कामात वेळ दौडणाऱ्या या राज्य सरकारला सर्व सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय घेण्यासाठी वेळ आणि निर्णय क्षमता नसल्याचे दिसून येत आहे.
यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील, भाजपा प्र.का.सदस्य महेश जाधव, भाजपा प.म.प्रवक्ते धनंजय महाडिक, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, सरचिटणीस विजय जाधव, गणेश देसाई, हेमंत आराध्ये, ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम, भगवान काटे यांच्या उपस्थितीमध्ये निवासी जिल्हाधिकारी शंकरराव जाधव यांना निवेदन सादर करत पेट्रोल व डिझेलचे दर कमी करण्याची मागणी करण्यात आली.
याप्रसंगी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे यांनी आपल्या मनोगतामध्ये राज्य सरकारच निषेध व्यक्त केला.
यावेळी ताराराणी आघाडीचे सत्यजित कदम, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, भगवान काटे, विजय आगरवाल, युवा मोर्चा अध्यक्ष विजयसिंह खाडे-पाटील, महिला मोर्चा अध्यक्षा गायत्री राऊत आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.