होम आयसोलेशनमध्ये उपचार घेणाऱ्या कोरोनाबाधितांना मोफत औषध व वैद्यकीय सेवा सल्ला

• कोल्हापूर भाजपाच्यावतीने सेवाकार्य
  कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोना लक्षणे नसलेल्या  रूग्णांसमोर सध्या आपण कोणते उपचार घेतले पाहिजेत याबाबत योग्य मार्गदर्शन होत नसल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी कोल्हापूरच्यावतीने भाजपा प्रदेशाध्यक्ष आम.चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये भाजपा कार्यालय  येथे अशा रूग्णांच्या नातेवाईकांना रुग्णाला आवश्यक असणाऱ्या आयुर्वेदिक, होमिओपॅथीक व अॅलोपॅथी औषधांचे मोफत कीट देण्याच्या सेवा कार्याची सुरवात करण्यात आली.   
     यावेळी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य महेश जाधव, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, संघटन सरचिटणीस अशोक देसाई, दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, अजित ठाणेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
      याप्रसंगी आम.चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, कोरोनाची तीव्रता वाढत असताना त्याची लक्षणेदेखील वेगवेगळी आहेत. बऱ्याच कोरोनाबाधित रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. लक्षणे नसताना आपण पॉझिटीव्ह आहोत यामुळे आपण कोणते उपचार घ्यावेत यावर तो गोंधळून जात आहे. सध्या या सर्वांना रुग्णालयात उपचार न घेता डॉक्टरांच्या सल्ल्याने गृहविलगीकरण करुन उपचार करणे गरजेचे बनले आहे. यामुळे रुग्णालय व्यवस्थेवरचा ताण कमी होण्यास मदत मिळणार आहे. भाजपाच्यावतीने या उपक्रमासाठी श्री विश्ववती आयुर्वेदिक चिकित्सालयाचे आयुर्वेदिक व डॉ. मत्तीवाडे यांच्या होमिओपॅथी व अॅलोपॅथीक औषधांच्या कीटमध्ये C.Moxclav 625 mg, Tab Celin 500 mg, Tab Becozinc, Tab Pan 40, Tab Dolo 650 अशी औषधे असणारे सुमारे १५०० रुपयांचे कीट त्याचबरोबर डॉक्टरांचे मानधन अशा स्वरूपात मोफत वैद्यकीय सेवा पुरवण्यात येणार आहे. यासाठी १० तज्ञ डॉक्टर रुग्णांना दिवसातून दोनवेळा व्हिडीओ कॉलमार्फत संपर्क करून उपचार आणि मार्गदर्शन करणार आहेत. रुग्ण बरा होईपर्यंत त्याला या औषधांचा पुरवठा करण्यात येणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून होम आयसोलेशनमध्ये सौम्य लक्षणे असणाऱ्या रूग्णांची रोगप्रतिकारक शक्ती व त्याचे मनोधैर्य वाढवण्याचा प्रत्यन करण्यात येणार आहे.
     भाजपा कार्यालयात तज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीमध्ये आज आलेल्या पेशंटच्या नातेवाईकांना औषधांचे  कीट देऊन ते कसे घ्यावे व कोणकोणती काळजी घ्यावी याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी डॉ. अश्विनी माळकर, डॉ. हितेश गांधी, डॉ. सुयोग फराटे, डॉ. प्रशांत पाटील, डॉ. सविता गांधी, डॉ. संग्राम मोरे आदी उपस्थित होते.
———————————————– 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *